दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराचे गुप्त अस्त्र- चिली ग्रेनेड

zolkiya-chilli
लपलेल्या ठिकाणांहून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर गुप्त अस्त्रांचा अत्यंत यशस्वी उपयोग करत असून या अस्त्रांमुळेच पाकिस्तानातून आलेले नावेद आणि नुकताच जम्मू काश्मीरमध्ये गुहेतून पकडला गेलेला सज्जाद अहमद यांना जिवंत पकडण्यात लष्कराला यश आल्याचे सांगितले जात आहे. हे गुप्त अस्त्र म्हणजे मिरचीपासून बनविले गेलेले ग्रेनेड आहेत. डीआरडीओने हे ग्रेनेड तयार केले असून ते २०१० पासून भारतीय लष्कराचा वापरात आहेत असेही समजते.

हे ग्रेनेड बनविताना आसामातील भूत झोलकिया या अतितिखट मिरचीचा तसेच काळी मिरी आणि फॉस्फरसचा वापर केला जातो. हा ग्रेनेड फुटला की डोळ्याची जळजळ होऊ लागते, श्वास घुसमटतो परिणामी शत्रुकडून होणारा प्रतिकार ढिला पडतो. सज्जाद जम्मू भागात उंचावरील गुहेत लपल्याचे व त्याच्यासोबत आणखीही कांही दहशतवादी लपल्याची खबर मिळताच लष्कराने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्यावर लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात तीन जण ठार झाले व त्यानंतर वापरल्या गेलेल्या चिली ग्रेनेडमुळे सज्जादला गुहेबाहेर येणे भाग पडले आणि तो जिवंत लष्कराच्या हाती सापडला.

आसामातील ही भूता झोलकिया मिरची नेहमीच्या मिरचीच्या तुलनेत १ हजार पट तिखट आहे. तिची नोंद सर्वाधिक तिखट मिरची म्हणून गिनीज बुकमध्येही झाली आहे. या मिरचीची पेस्ट जंगली हत्तींपासून बचाव करण्यासाठीही वापरली जाते असेही समजते.

Leave a Comment