सेटिनल बेटांवर जाताय? जीव गमवाल

island
भारताच्या अंदमान निकोबार बेट समूहातील असंख्य बेटे आज पर्यटनासाठी लोकप्रिय ठरली आहेत. मात्र येथील नॉर्थ सेटिनल बेट याला अपवाद आहे. या बेटावरील रहिवासी अजूनही संपूर्ण जगापासून अलिप्त आहेत आणि या बेटांवर जर जाण्याचा कुणी प्रयत्न केलाच तर ते त्यांना जीवे मारून टाकतात. येथील स्थानिक आदिवासी अजूनही अश्मयुगात वावरत आहेत आणि आपल्याच पद्धतीने जगणे त्यांना पसंत आहे.

या आदिवासींना मानवी सभ्यता वगैरे बाबी माहितीच नाहीत. १९८१ सालात येथे कांही भरकटलेले प्रवासी पोहोचले मात्र बेटावर उतरण्यापूर्वीच या आदिवासींनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला असे सांगितले जाते. त्सुनामी आली तेव्हा भारतीय वायुदलाचे जवान येथे गेले तेव्हा त्यांच्यावरही असाच जीवघेणा हल्ला केला गेला. अजूनही चुकून भरकटलेले मच्छीमार या भागात आलेच तर ताबडतोब मार्ग बदलून दुसरीकडे जातात.

या बेटावर आजही घनदाट जंगल आहे. येथील आदिवासी आजही शिकार करून जगतात. येथे शेतीविषयी कांहीच माहिती नाही. आधुनिक युगाचा वाराही येथे पोहोचलेला नाही. अनेक दिवसांपूर्वी कांही पत्रकार,पुरातन विभागाचे अधिकारी यांनी येथे उतरण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनाही या आदिवासींनी विषारी बाण दाखवून पळवून लावल्याचे सांगितले जाते. २८ चौरस मैल परिसराच्या या बेटावरील ही वसाहत ६० हजार वर्षांपूर्वीच झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो. येथे साधारण ४०० लोक रहात असावेत असे उपग्रहाच्या सहाय्याने केलेल्या चित्रीकरणात दिसून आले आहे

Leave a Comment