७ ऑगस्टपासून खुले होणार पुष्प पठार !

kas-pathar
राजापूर : साता-यानजीकच्या पुष्पसृष्टीचे अर्थात जागतिक वारशाचा दर्जा मिळालेले कासचे पुष्प पठार येत्या ७ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. हे पुष्प पठार दरवर्षी पर्यटकांचा नवा उच्चांक स्थापित करत असून, मागील वर्षी पाच लाख पर्यटकांनी या पठाराला भेट दिल्याची माहिती वनखात्याने दिली आहे.

सौंदर्याची खाण समजल्या जाणा-या कासच्या पुष्प पठाराला पश्चिम घाटासह वल्र्ड हेरिटेज म्हणजेच जागतिक वारसा स्थळांत युनेस्कोने समाविष्ट केले आहे. साता-यापासून २३ कि.मी. अंतरावर हा धरतीवरचा स्वर्ग अवतरत असतो.

फुलांसाठी एकमेव नैसर्गिक वारसा स्थळ म्हणूनदेखील या पठाराची ओळख आता देशविदेशी पोहोचली आहे. कास पुष्प पठाराची
समुद्रसपाटीपासूनची उंची १२१३ मीटर असून १७९२ हेक्टरवर हे पसरले आहे. यात वनखात्याची ११४२ हेक्टर तर ६५० हेक्टर खासगी जमिनीचा समावेश आहे. पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या ८५० पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार येथे आढळले आहेत. तसेच कीटक व विविध ३२ प्रकारच्या फुलपाखरांचे प्रकार येथे आढळतात. या पठारावर पावसाळा संपता संपता ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत रानफुले येतात. दर नऊ वर्षांनी फुलणारी टोपली कार्वी ही त्यापैकी कास पठाराचे वैशिष्ट्ये गणले जाते. येथील वातावरण रंगीबेरंगी असून कधी पांढरा शुभ्र तर कधी लाल, निळा, जांभळी, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांची फुले पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात.

Leave a Comment