देश-विदेशात सोलापुरातून होणार गोवर्‍यांची निर्यात

gobar
सोलापूर – देशातच नव्हे, तर विदेशातही चादर आणि टॉवेलच्या निर्यातीसाठी प्रख्यात असलेल्या सोलापूरने आता चक्क गोवर्‍यांची निर्यात करण्याच्या दिशेनेही पुढाकार घेतला आहे. शेतीला पूरक उद्योग म्हणून गोवर्‍यांच्या निर्यातीचा हा व्यवसाय शेतकर्‍यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

शहरातील डॉक्टर्स आणि समाजसेवकांनी एकत्र येऊन देशी गायींच्या संवर्धनासाठी गोशाळा काढली. या गोशाळेतून गायींचे संगोपन करण्याचे महान कार्यही करण्यात येणार आहे. जनावरे जोपर्यंत दूध देतात, तोपर्यंत त्यांची उपयुक्तता असते. पण, भाकड गायींविषयी कमालीची उदासीनता दिसून येते. शेतकरी भाकड जनावरे थेट कसायाला विकतात. सोलापुरात मात्र या भाकड गायींची उपयुक्तता सिद्ध करणाराही प्रकल्प आहे. जय संतोषी माता गोशाळेच्या माध्यमातून समाजातील तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन हा प्रकल्प सुरू केला. कत्तलखान्यात चाललेल्या गायी विकत घेऊन त्यांनी ही गोशाळा सुरू केली. व्यवसाय किंवा नफा कमावण्यासाठी नव्हे, तर देशी गोधन वाढविणे, एवढाच यामागील हेतू आहे.

सोलापूरच्या चार तरुण डॉक्टरांनी एकत्र येऊन देशी गायींच्या संवर्धनासाठी विडी घरकुल परिसरात ही गोशाळा सुरू केली. दानशूर लोकांनी या कामासाठी पाऊण एकर जमीन उपलब्ध करून दिली. सात वर्षांपूर्वी सात गायी या गोशाळेत होत्या. आता तिथे ८५ गायी असून, गोसेवेसोबत गोवर्‍यांचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. प्रत्येक गायीवर दररोज ६० रुपये इतका खर्च होतो. २५ गोवर्‍यांचे एक पाकीट ३५ रुपयाला विकले जाते. सुरुवातीला स्थानिक बाजारपेठेत विकल्या जाणार्‍या गोवर्‍या आता विदेशात पाठविल्या जात आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमामुळे महिलांनाही रोजगार मिळाला आहे. या गोशाळेत तीन महिला दररोज सुमारे दीड हजार गोवर्‍या तयार करतात. त्यांना मासिक पाच ते सहा हजार रुपये वेतन दिले जाते. आता येथून दरवर्षी अडीच ते तीन लाख गोवर्‍या विदेशात पाठविल्या जातात.

Leave a Comment