अडवाणींची पिरपिर

advani
मााजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे आता काय होणार असा प्रश्‍न चर्चिला जात असतो. त्यांना पंतप्रधान होता आले नाही म्हणून त्यांच्या मनात नैराश्य दाटून आले आहे. ते निरनिराळ्या प्रसंगांनी प्रकट होत असते. त्यांनी गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना निशाणा केले. अडवाणी हेही एकेकाळी उपपंतप्रधान होते पण त्यांनी त्या पदाला काय न्याय दिला ? त्या मानाने मोदी अधिक चमकत आहेत. अडवाणी यांच्या मनातली खदखद त्यामुळे अधिकच वाढली आहे. म्हणून ते मोदी यांना अपशकून करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या मनाचे समाधान करून घेतात. त्यांनी आता नवे ट्विट केले आहे. आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा आपण पदाचा राजीनामा दिला होता याची आठवण करून देऊन त्यांनी आता सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांना डिवचले आहेे. त्यातून त्यांना मोदी यांनाच लक्ष्य करायचे आहे.

अडवाणी यांना कदाचित राष्ट्रपती केले जाईल असे बोलले जात होते पण त्यांनी आता अशा काही पदाचे दरवाजे आपल्या हाताने बंद करायला सुरूवात केली आहे. ते फार मोठे मुत्सद्दी नेते मानले जातात पण ते तसे नाहीत ही गोष्ट ते स्वत:च सिद्ध करत आहेत. त्यांच्या या विचारांत काहीही तथ्य नाही पण ते आता असेच विपरीत प्रलाप काढत राहणार असे दिसायला लागले आहे. मोदी यांचे पंतप्रधान होणे आणि त्या पदावरून त्यांचे धडाकेबाज काम करणे काही लोकांना सहन झालेले नाही. अशा लोकांत अडवाणी आता फारच लोकप्रिय व्हायला लागले आहेत. अडवाणी जे काही म्हणत आहेत त्यात तथ्य आहे असे आता हे लोक म्हणायला लागले आहेत. कारण त्यांच्या मोदी विरोधाची खाज बुजेल अशीच मते अडवाणी व्यक्त करीत आहेत.

राजकीय नेते आणि अभिनेते त्यांच्यावर पडणारा प्रसिद्धीचा झोत कमी झाला की वेडे होतात. अशा स्थितीत त्यांना चांगले जीवन जगायचे असेल तर त्यांच्या विचारांना आध्यात्मिक बैठक असायला हवी पण अडवाणी यांचे वैचारिक बैठक तशी नाही. म्हणून ते असमाधानी आहेत आणि ते असमाधान प्रकट केल्याशिवाय त्यांना रहावत नाही. काही लोकांच्या मते वृद्धत्वात असे प्रश्‍न निर्माणच होत असतात. कारण माणूस जसा वयाने वाढत जातो तशी त्याची झोप कमी होत असते. झोप कमी म्हणजे दिवसातला जास्तीत जास्त वेळ त्यांना मोकळा मिळतो. त्या मोकळ्या वेळेत काय करावे या समस्येने त्यांना घेरलेले असते आणि त्या समस्येतून असे प्रकार निर्माण होत असतात. अडवाणी यांनी आपला मोकळा वेळ अधिक विधायक कामाला लावला पाहिजे.

Leave a Comment