एक सेकंदाने वाढणार ३० जून !

june

आंतरराष्ट्रीय अर्थ रोटेशन सर्व्हिसचा निर्णय

वॉशिंग्टन – बस्स एक सेकंद… उच्चारण्याआधीच हा सेकंद निघून गेलेला असतो. या एका सेकंदाचे काय मोल आहे, याची जाणीव आपल्यापैकी कदाचितच कुणाला असेल. पण, हाच एक सेकंद येत्या ३० जूनला सेकंदाने का होईना मोठा करणार आहे. अर्थात, ३० जून या दिवसात अतिरिक्त एक सेकंद जोडला जाणार आहे…!

हा अतिरिक्त सेकंद जोडण्यात आल्यानंतर आपण ३० जून २०१५ रोजीच्या वेळेचा क्रम २३ तास-५९ मिनिटे-५९ सेकंद… ३० जून २०१५ : २३ तास-५९ मिनिटे-६० सेकंद… १ जुलै २०१५ : ०० तास-०० मिनिटे ०० सेकंद असा अनुभवणार आहोत. हा सर्व फरक या केवळ एका सेकंदामुळे होणार आहे.

पृथ्वीच्या भ्रमणात किरकोळ स्वरूपाचे बदल करणार्‍या आणि त्यानुसार जागतिक वेळांमध्ये बदल घडवून आणणार्‍या इंटरनॅशनल अर्थ रोटेशन ऍण्ड रेफ्रन्स सिस्टिम सर्व्हिस (आयईआरएस) या जागतिक मंडळाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

पृथ्वीची भ्रमंती किंचित अशा क्षणाने हळू झाली आहे. त्यामुळे ही गती पूर्ववत आणण्यासाठी वेळेत अतिरिक्त सेकंदाचा समावेश करणे हाच उपाय आहे, असे स्पष्टीकरण नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरचे डॅनियल मॅकमिलन यांनी दिले.

एक दिवस हा ८६,४०० सेकंदाचा असतो. अर्थात लोक आपल्या दैनंदिन आयुष्यात इतक्याच सेकंदाचा वापर करीत असतात. पण, सौर दिवसात पृथ्वी भ्रमणासाठी किती वेळ घेते, या आधारे त्या दिवसाची लांबी मोजली जाते आणि यात हा दिवस ८६,४००.००२ सेकंदाचा असल्याचे दिसून येते. याचाच अर्थ, पृथ्वीच्या भ्रमणाची गती किंचित कमी झालेली असते. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्यातील गुरुत्वाकर्षणाच्या संघर्षाचा परिणाम पृथ्वीच्या भ्रमणगतीवर होत असतो. एक दिवस हा ८६,४०० सेकंदाचा असला, तरी १८२० पासून हा कालावधी एकसारखा कधीच राहिला नाही. किमान दोन मिलीसेकंदाचे अंतर नेहमीच दिसून आले आहे, असे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाने म्हटले आहे.

Leave a Comment