कॉंग्रेसची पंचाईत

trio
मोदी सरकारने आपले एक वर्ष पूर्ण केले तेव्हा वर्षात भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्याचा दावा केला. देशातला भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर उच्चस्तरीय भ्रष्टाचार आधी संपला पाहिजे. मोदी सरकारने तसा तो संपवल्याचा दावा केला आहे. तो कॉंग्रेसला खटकत असणारच कारण कॉंग्रेसचे सरकार त्याच मुद्यावर गेले आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपाचा भ्रष्टाचार उकरून काढून भाजपाचा भ्रष्टाचार निर्मुलनाचा दावा फोल असल्याचे दाखवून देण्यासाठी कंबर कसली. लोकशाहीत ते विरोधी पक्षाचे कामच असते. त्यामुळे माध्यमांनी कॉंग्रेसला मानसिक बळ द्यायला सुरूवात केली. विशेषत: ज्या माध्यमांना मोदी सरकार सत्तेवर आले आहे ही वस्तुस्थिती अजून पचलेली नाही किंवा ज्या पत्रकारांना ती रुचली नाही त्या माध्यमांनी आणि पत्रकारांनी तर या नव्या अवतारात कॉंग्रेसला फारच उचलून धरले.

मग कॉंग्रेसच्या नेत्यांनी आधी ललित मोदीचा, नंतर पंकजा मुंडे यांचा आणि आता त्या कथित तीन भाजपा मंत्र्यांच्या स्टिंगचा फारच गवगवा केला. कॉंग्रेस पक्ष आता भाजपाला उघडे पाडण्यास सज्ज झाला असल्याचे म्हटले जायला लागले आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही जोर चढला. पण कॉंग्रेसला हे अवसान फार दिवस सांभाळता येणार नाही असे दिसायला लागले आहे. त्यामुळे येत्या चार पाच दिवसात या सार्‍या प्रकरणांत कॉंग्रेसचे नेते चुप बसलेले दिसतील. काचेच्या घरात राहणारांनी दुसर्‍यांच्या घरांवर दगड फेकू नयेत असे म्हटले जाते पण भाजपाला उघडे पाडण्यासाठी कंबर कसलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांना हे माहीत नाही. ललित मोदी याला भेटणारा भ्रष्ट असे समीकरण कॉंग्रेसच्या नेत्यांनी मांडले आणि एका मागे एका भाजपा नेत्याला भ्रष्ट ठरवायला सुरूवात केली. पण आता ललित मोदी याने आपण प्रियंका गांधी आणि वढेरा यांनाच भेटल्याचे जाहीर केले आहे.

पंकजा मुंडे यांच्या चिक्कीच्या प्रकरणात कॉंग्रेसने तर फारच गहजब केला. या प्रकरणाचा कथित गौप्यस्फोट दिल्लीत केला. गेले चार दिवस मोठा गोंधळ चालला आहे पण आता ही चिक्की कॉंग्रेसच्या कार्यकर्तीनेच पुरवली असल्याचे समजले आहे. या कार्यकर्तीने चिक्कीचा कारखाना सूर्यकांता पाटील यांच्या नावाने काढला आहे. आता चिक्की प्रकरणात कॉंग्रेस नेते मूग गिळून बसतील. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन मंत्र्यांचा भंडाफोड करण्याची वल्गना केली होती पण आज त्यावरून घूमजाव केले. कोणाचा भंडाफोड करण्याआधी गृहपाठ करावा आणि या भंडाफोडीत नेमका आपलाच भंडा फुटू नये एवढीही दक्षता त्यांना घेता येत नाही.

Leave a Comment