स्टेशनमास्तर मांजरीचे निधन

tama-manjar
जपानमधील छोट्याश्या रेल्वे स्टेशनची स्टेशनमास्तर म्हणून कार्यरत असलेल्या तामा नावाच्या मांजरीचे स्थानिक पशु चिकित्सालयात निधन झाल्याची बातमी असून ही मांजरी १६ वर्षांची होती. २००७ पासून ती या स्टेशनवर स्टेशनमास्तरची ड्यूटी केवळ जेवणाच्या बदल्यात बजावीत होती असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार प.जपानच्या वाकायामा या छोट्याश्या कसब्याच्या किशी स्टेशनवर हे पिलू रेल्वे कर्मचार्‍यांना मिळाले. त्यांनी ते पाळले. जपानच्या स्थानिक रेल्वे कंपनीला एवढ्याशा रेल्वे स्टेशनवर स्टेशनमास्तरची नियुक्ती करणे गरजेचे वाटत नव्हते कारण त्यासाठी येणारा खर्च जास्त होता. अखेर २००७ साली तामा मांजरीलाच स्टेशनमास्तरचे काम देण्यात आले. तिला स्टेशनमास्तरची हॅटही दिली गेली. शिवाय दोन सहाय्यक मांजर्‍या तिच्या मदतीला दिल्या गेल्या. या तिघीही मांजर्‍या नियमितपणे प्रवाशांना अभिवादन करत असत.

तामा मांजरीने केवळ स्टेशनमास्तरची भूमिकाच पार पाडली नाही तर या गावाच्या आर्थिक विकासालाही मोठा हातभार लावला. कारण मांजरी स्टेशनमास्तरचे काम करते ही बातमी देशविदेशात पसरली आणि हजारोंनी पर्यटक तिला पाहण्यासाठी येथे येऊ लागले. नोकरीच्या पहिल्या वर्षातच तामाला पाहण्यासाठी या चिमुकल्या स्टेशनला ५५००० लोकांनी भेट दिली आणि त्यातून गावाला १.१ अब्ज येनचा फायदा झाला असेही समजते.

Leave a Comment