टीआरपी वाढवण्यासाठी कसरत

rane
अभिनेते असोत की नेते असोत त्यांंना प्रसिद्धीचे टॉनिक लागतेच. कोणत्याही प्रकाराने का होईना पण नाव छापून आले पाहिजे असा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. आता राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या संंबंधात असेच घडत आहे. त्यांचा राजकारणातला टीआरपी कमी झाला आहे. ते समदु:खी आहेत. त्यांनी आपल्या राजकीय क्षमतेबाबत जे अवास्तव दावे केेले होते ते फोल ठरले आहेत. यांच्या हातात आता कसलेही पद नाही. राज्याच्या राजकारणात कसला म्हणून कसला वट्टही नाही. त्यामुळे त्यांच्या बातम्या येणे बंद झाले आहे. कधी तरी राज ठाकरे यांनी देशातल्या एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली तर त्यांचे काही खास चाहते पत्रकार आहेत ते ती प्रतिक्रिया प्रसिद्ध करतात पण त्या प्रतिक्रियेला राजकारणाच्या संदर्भात कसलेही महत्त्व नसते.

अशा काही किरकोळ घटना सोडल्या तर राणे आणि राज ठाकरे हे उपेक्षेच्या अंध:कारात चाचपडत आहेत. त्यांना आपण अजूनही कसला तरी करिष्मा करूच असे वाटत असले तरीही राज्यातली राजकीय स्थिती तसे काही सांगत नाही. आपले राजकारणातले अस्तित्व कायम टिकवणे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणे यासाठी राणे आणि राज ठाकरे हे दोघेही आपल्या भेटीच्या बातम्या पेरून लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. एकदा नितेश राणे आणि राज ठाकरे तर नंतर नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या बातम्या आल्या. नंतर या भेटी सहजच झाल्या असल्याचे खुलासे करणार्‍या बातम्या झळकल्या. या दोन बातम्या संपल्या की हे खुलासे नाकारणार्‍या आणि या भेटीत काय दडले आहे याचा अंदाज व्यक्त करणार्‍या बातम्या झळकल्या.

मग या दोघांच्या एकत्रीकरणाचे परिणाम काय होणार यावर अंदाज व्यक्त करणार्‍या बातम्या झळकल्या. ही सारी चर्चा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कशी परिणाम करू शकतेे यावर काही विद्वान पत्रकारांचे चर्वण होते. हे सारे काही करायचे असेल तर नारायण राणे कॉंग्रेस मध्ाून बाहेर पडणे गरजेचे आहे. मग राणे कॉंग्रेसमध्ये असे अस्वस्थ आहेत याची चर्चा ओघानेच आली. या चर्चेला चार दिवस गेल्यावर असे लक्षात येते की यातले काहीच घडत नाही. अर्थात शहाण्यांना हे सारे माहीत असते. पण आपले या बाबतचे अंदाज चुकले असे कोणी मान्य करीत नाहीत. नारायण राणे आणि राज ठाकरे या दोघांनीही अनेकदा अशा चचार्र्ं होतील असे प्रकार केले आहेत. त्यातलाच हा प्रकार आहे.

Leave a Comment