आणीबाणीचा धडा

emergency
आणीबाणीला चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आणीबाणी, तिच्यामागची पार्श्‍वभूमी आणि त्या काळात घडलेल्या घटना यावर काही लोक काही नवी माहिती पुढे आणत आहेत. आजवर आपला समज असा होता की, ंइदिरा गांधी यांची निवडणूक रद्द झाली आणि त्यांना पदावर राहता येईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त व्हायला लागली. अशा स्थितीत त्यांनी आपले पद जाऊ नये यासाठी आणी बाणी आणली. पण आता त्यांच्या जवळच्या सहकार्‍याने ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे. निवडणूक रद्द होण्याच्या घटनेआधीच इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणण्याचा विचार केला होता आणि तशी तयारी सहा महिन्यांपासून सुरू केली होती असे त्यांनी म्हटले आहे. आता तेही सत्तरीच्या उंबरठ्यावर आहेत आणि आणीबाणीचे प्रत्यक्ष साक्षीदार मोठ्या प्रमाणावर हयात नाहीत. त्यामुळे या नव्या प्रतिपादनावर काही टीका टिप्पणी करण्याचा अधिकार असलेले कोणी हयात असण्याची शक्यता कमी आहे. एकंदरीत आणीबाणी ही संकटकालीन उपाय योजना होती की देशावर हुकूमशाही लादण्याचा इंदिरा गांधी यांना एकूणच इरादा होता हे स्पष्ट होत नाही.

त्यांनी तशी तयारी फार पूर्वीपासूनच सुरू केली असेल तर मात्र काही गोष्टी दिसायला लागतात. तसे असल्यास त्यांच्या त्या विचारामागे संजय गांधी यांचा मोठाच तगादा असेल असे दिसते. कारण त्याची विचार करण्याची पद्धत तशी होती. लोकांना लोकशाही वगैरे काही समजत नाही. त्यांना दंडे मारूनच वठणीवर आणावे लागते असा त्यांचा विचार होता. देशाची लोकसंख्या हा फार मोठा प्रश्‍न आहे आणि सर्व समस्यांचे ते मूळ आहे अशी अपरिपक्व भाषा बोलणारे लोक अजूनही आपल्या देशात आहेत. त्यांना आपल्या देशातल्या गरिबांची दया येत नाही. घृणा येते. हे गरीब लोक देेशाची लोकसंख्या वाढवून मोठी समस्या निर्माण करीत आहेत. त्यांना सांगून समजत नाही. त्यांना सक्तीने शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले पाहिजे असे त्यांचे मत असते. संजय गांधी याला असे काही तरी करायचे होते. त्यासाठी त्याला आपल्या हातात सर्वाधिकार हवे होते. त्यांनी ते त्याच रितीने राबवूनही दाखवले. आपल्या देशातले आणी बाणी नावाचे दु:स्वप्न आता संपले आहे पण अजूनही संजय गांधी याचा विचार योग्यच होता असे मानणारे लोक आपल्या देशात आहेत. आता पुन्हा देशात आणीबाणी येईल की नाही हे सांगता येत नाही असे लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे त्यामागे हे कारण आहे. कारण संजय गांधी याच्यासारखा विचार करणारे लोक अजूनही आपल्या देशात आहेत.

देशात उघडपणे हुकूमशाहीचे समर्थन करणारे कोणी आता तरी नाहीत पण काही वर्षांपूर्वी मर्यादित हुकूमशाही, चांगल्या कारणासाठी ठोकशाही किंवा वाईट लोकांना वठणीवर आणण्यासाठी एकाधिकारशाही असायला काही हरकत नाही असे मानणारा वर्ग आपल्या देशात आहे. कै. बाळासाहेब ठाकरे हे त्यातलेच एक. त्यांनी त्याचे समर्थनही केले होते. पण या लोकांना हे कळत नाही की, एकदा हुकूमशाही आली की ती चांगल्या कामासाठी राबवली जात आहे की वाईट कामासाठी राबवली जात आहे याची शहानिशा करण्याइतपत स्वातंत्र्य रहात नाही. आणीबाणीत हेच घडले. इंदिरा गांधी यांना विरोधी पक्षमुक्त लोकशाही हवी होती. त्यांनी आपली ती कल्पना राबवली ती देशाच्या हितासाठी म्हणून. निदान तसा आव तरी आणला पण संजय गांधी यांनी नको ते व्याप करायला सुरूवात केली तेव्हा इंदिरा गांधी यांचा कथित चांगला हेतू बाजूला पडत आहे असे त्यांना कोणी सांगूही शकले नाही कारण त्यांच्या भोवती सारे चमचे आणि खुषमस्करेच जमा झाले होते.

आणीबाणी ही हुकूमशाहीच होती. तिच्यानंतर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला पण तो पराभव नेमका का झाला याची नीट शहानिशा व्हायला हवी. आपल्या देशातल्या लोकांना एकाधिकार शाहीची खरेच घृणा आहे म्हणून इंदिरा गांधी पराभूत झाल्या का ? की केवळ कुटुंब नियोजनाच्या बाबतीत सक्ती झाली याचा राग आल्यामुळे लोकांनी त्यांना पराभूत केले ? आणीबाणी आली आणि गेली पण लोकांच्या मनात लोकशाहीची कल्पना घट्ट रुजली असल्याचे काही दिसून आले नाही. अजूनही अनेक ठिकाणी लोकशाहीच्या नावाखाली स्थानिक नेत्यांची मनमानी चाललेली असते. आपल्या देशात खरेच सर्वत्र लोकशाही आहे का? जिथे ती नसेल तिथे लोक खरेच तिला उखडून टाकतात का ? गेल्या वर्षी एका नेत्याने आपल्या मुलीच्या विवाहाचा मोठा बार उडवून दिला. त्याने केलेला थाट हे संपत्तीचे बिभत्स प्रदर्शनच होते पण त्याने एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या या प्रदर्शनाचे समर्थन केले. आम्ही आमच्या मतदारसंघाचे राजेच असतो त्यामुळे लोक आमच्या अशा थाटामाटाची वाटच पहात असतात असे त्याचे म्हणणे होते. लोक आपल्या नेत्यांना अजूनही राजे समजतात. ही बाब लोकशाहीशी विसंगत आहे कारण लोकशाहीत नेते हे लोकांचे राजे नसून त्यांचे प्रतिनिधी असतात. पण देशातल्या लोकांच्या आणि नेत्यांच्याही मनात ही राजेपणाची कल्पना घट्ट रुजलेली आहे. ही समजूत हीच अजूनही आणीबाणी येण्यास अनुकूल भूमी ठरणार आहे.

Leave a Comment