मौनीबाबांची वाणी

manmohan
अनेकदा माणसाचे मौन हे सातत्याने बोलण्यापेक्षा स्फोटक असते असे म्हणतात. आपले माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे मौनी बाबा आहेत आणि फार बोलत नाहीत. त्यांचे मौन हे बोलण्यापेक्षा सूचक असते असे म्हणतात पण प्रत्यक्षात काही वेळा असा अनुभव येतो की, त्यांचे कमी का होईना पण बोलणेच त्यांच्या मौनापेक्षा धोकादायक ठरते. आता ते त्यांच्यावरच्या एका आरोपाच्या संदर्भात बोलले आहेत आणि त्यांच्या बोलण्याची अशी काही खिल्ली उडवली जात आहे की त्यांनी बोलण्यापेक्षा मौन पाळले असते तर बरे झाले असते असे वाटावे. आता निमित्त झाले आहे ते दूरसंचार प्राधीकरणाचे माजी प्रमुख प्रदिप बैजल यांचे पुस्तक. बैजल यांनी यूपीए सरकारच्या कार्यकालातल्या २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातल्या आणखी काही तथ्यांची माहिती देणारे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. आजवर अशी आणखीही काही पुस्तके निघाली आहेत आणि मनमोहन-सोनिया सरकार किती भ्रष्ट होते याचे खुलासे झाले आहेत. त्यात आता एका पुस्तकाची भर पडली आहे. असे कोणतेही पुस्तक बाजारात आले की कॉंग्रेसने त्यातल्या आरोपाविषयी स्पष्टीकरण करण्याऐवजी हे सारे आरोप निखालस खोटे आहेत असा प्रत्यारोप केला आहे. तसा एका शब्दाचाही पुरावा दिलेला नाही.

आता प्रदिप बैजल यांचे पुस्तक अंगलट येत असताना नेमका तसाच प्रकार सुरू झाला आहे. मात्र या वेळच्या प्रत्यारोपात मनमोहनसिंग हे स्वत: बोलले आहेत. मनमोहनसिंग हे केवळ गुळाचा गणपती झालेले पंतप्रधान होते आणि ते केवळ सेनिया गांधी यांच्या हातचे बाहुले होते असे आपण समजत होतो म्हणून कसला नवा आरोप झाला की, पक्षाचे प्रवक्ते तरी बोलत असत किंवा दिग्विजयसिंग तरी काही बाष्कळ टिप्पणी करीत असत. आता मनमोहनसिंग बोलले कारण बैजल यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. दयानिधी मारन यांना दूरसंचार मंत्री करू नये अशी मागणी बैजल यांनी केली असतानाही मनमोहनसिंग यांनी त्यांना हे खाते दिले आणि आपली सूचना धुडकावून लावली असा तर बैजल यांचा आरोप आहेच पण आपण तरीही मारन यांना सहकार्य करावे असे बजावले. सहकार्य न केल्यास आपल्याला वाईट परिणामांना तोंड द्यावे लागेल अशी धमकीही दिली असा गौप्यस्फोट बैजल यांनी केला आहे. आपण अरुण शौरी आणि रतन टाटा यांना २ जी घोटाळ्यात अडकवावे असाही दबाव सिंग यांनी आपल्यावर आणला असाही बैजल यांचा आरोप आहे आणि आपल्या या आरोपाला दुजोरा देणारा पुरावा आपण सादर करायला तयार आहोत असेही बैजल यांनी म्हटले आहे.

टाटांनीही मारन यांनी आपल्याला धमक्या दिल्या होत्या असे म्हटले आहे. आता चर्चा या टोेकाला आल्यावर बैजल यांचे हे आरोप खोटे आहेत असे कॉंग्रेस पक्षाला किंवा मनमोहनसिंग यांना वाटत असेल तर त्यांनी बैजल यांना त्यांच्याकडील पुरावे सादर करण्याचे प्रतिआव्हान द्यायला हवे होते पण तसे आव्हान देण्याची हिंमत ना कॉंग्रेसने दाखवली ना मनमोहनसिंगांनी दाखवली. या उपरही आपण बैजल यांच्या आरोपांना काही प्रमाणात डिस्काउंट देऊ. बैजल सारे काही खोटे सांगत आहेत असा हा डिस्काउंट १०० टक्के दिला तरीही मनमोहनसिंग हे भ्रष्टांचे बादशहा ठरतात. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातले दूरसंचार खाते अशा माणसाला दिले होते की जो स्वत: एका दूरसंचार कंपनीचा मालक आहे. अशा नेमणुकांनी हितसंबंधांचा टकराव होतो. असा मंत्री आपल्या खात्याची धोरणे आपल्या स्वत:च्या कंपनीचे हित समोर ठेवून आखू शकतो आणि त्यात सरकारचे नुकसान होते. तसे झाले आहे की नाही ही चर्चा न करता आपण हे पाहिले पाहिजे की, मारन यांना दूरसंचार मंत्री करताना हा संकेत बाजूला सारला होता. या गोष्टीला तर काही पुराव्याची गरज नाही.

मनमोहनसिंग जर फार स्वच्छ असल्याचा दावा करीत असतील तर त्यांना हा सवाल केला पाहिजे की, दूरसंचार कंपनीचा मालक असणार्‍याला त्याच खात्याचा मंत्री करताना त्यांना या संबंधातल्या संकेतांची आठवण झाली नाही का? ती त्यांना होतीच कारण ते फार अनुभवी मंत्री होते. तरीही त्यांनी मारन यांना हे खाते दिले कारण त्यांच्यावर तसा दबाव होता. त्यांनी या दबावालाही दुजोरा देणारे विधान केले होते. मी भ्रष्टाचाराला चाप लावला असता तर मला पंतप्रधानपद गमवावे लागले असते असे त्यांनी एका पत्रकार परिषदेतच म्हटले होते. या सगळ्या गोष्टी पाहिल्या म्हणजे बैजल यांना कसलाही पुरावा सादर करण्याची काही गरजच नाही हे लक्षात येते. या सगळ्या गोष्टी एवढ्या स्पष्ट आहेत ही मनमोहनसिंग यांची खरी पंचाईत आहे. अशी पंचाईत झाली आणि आपल्यावर झालेला आरोप असा निर्विवाद आहे हे लक्षात आले की आरोप झालेल्याची फार गोची होते आणि तिच्यातून बाहेर पडण्यासाठी असे लोक आपल्यावरील आरोपाचे स्पष्टीकरण करण्याऐवजी विषय तरी बदलतात किंवा आरोप करणारांचा हेतू चांगला नाही असा हेत्वारोप करून आपली सुटका करून घेण्याची धडपड करायला लागतात. मनमोहन सिंग यांनी असाच पवित्रा घेतला असून आपल्यावरील आरोपांचा खुलासा करण्याऐवजी एनडीए सरकारच्या एका वर्षाच्या कालावधीत देशातली लोकशाही धोक्यात आली असल्याचा हल्ला केला आहे. यावर आपण काय बोलणार? ज्या माणसाने हातात पंतप्रधानपद असताना त्या पदाचा वापर केला नाही आणि आपले सारे अधिकार सोनिया गांधी यांच्या पायावर समर्पण करून लोकशाहीतल्या या सर्वोच्च पदाचा अवमान केला त्या माणसाने कोणालाही लोकशाहीे धडे शिकवणे म्हणजे सैतानामुखी बायबल.

Leave a Comment