देशाची लाही लाही

heat
उन्हाचा तडाखा, अंगाची लाही लाही आणि तापमानाचे विक्रम यात तसे नवे काही नाही. आपला देशच मुळात उष्ण कटिबंधावत असल्यामुळे तापमान हा काही नवालचा विषय नाही. नेहमीप्रमाणेच या गोष्टी देशात घडत आहेत आणि काही शे लोक उष्माघाताने मरत आहेत. यात नवे काही नाही पण नवा आहे तो तापमानाचा लहरीपणा. आपण गेल्या दोन वर्षात पावसाचा लहरीपणा अनुभवला आहेच पण आता आपण उन्हाचा लहरीपणा अनुभवत आहोत. दोन वषार्र्ंपूर्वी तर उन्हाळा तोंडावर आला असताना महाराष्ट्रात गारपीट झाली. जिथे पावसाळ्यात गारपीट होणे अशक्य वाटत होते तिथे उन्हाळ्यात गारपीट झाली. ती काही अपवादात्मक ठिकाणीच झाली होती असे नाही तर राज्यात बहुतेक जिल्ह्यांनी या लहरी पावसाचा अनुभव घेतला. अशा प्रकारचा लहरीपणा हा केवळ लहरीपणाच नव्हता तर तो विक्रमी लहरीपणा होता. कारण अशा प्रकारची उन्हाळ्यातली आणि व्यापक गारपीट महाराष्ट्राने गेल्या ३०० वर्षात अनुभवली नव्हती. केवळ गारपीटच नाही तर पावसाने आपल्या अवकाळी अवताराचा आविष्कारही सातत्याने घडवला.

शेतकरी मोठ्या प्रमाणावर बरबाद झाला. या कटु आठवणी पाठीशी घालून आपण उन्हाळ्याचा अनुभव घेत असताना लहरीपणाला उन्हाळाही अपवाद नाही असे दिसायला लागले आहे. कारण उन्हानेही लहरीपणाचाच क्रम जारी ठेवला आहे. आधीच सार्‍या जगात ग्लोबल वॉर्मिंगचा गवगवा झालेला आहे. पूर्ण पृथ्वीचेच सरासरी तापमान अर्ध्या ते एक अंशाने वाढले आहे अशी ओरड केली जात आहे. त्याचे गणित मांडले जात असतानाच उन्हाळाही कडक होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांचे तापमान आधीच जास्त आहे. नांदेड, परभणी, नागपूर आणि विदर्भातले बहुसंख्य जिल्हे तापमानाच्या बाबतीत प्रसिद्ध आहेत. राज्यातले कोल्हापूर, सातारा, राजधानी मुंबई असे काही तुलनेने कमी तप्त असणारे जिल्हे सोडले तर राज्याचा मोठा भाग कमालीचा गरम असतोच पण या वर्षी तापमानाच्या बाबतीत या भागात लहरीपणा जाणवत आहे. महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी ४५ अंश सेल्सीयसच्या आसपास कमाल तापमान नोंदले जात असते. चंद्रपूर सारखे ठिकाण तर ४७ आणि ४८ अंश तापमानाच्या बाबतीत ख्यातनाम आहे. मराठवाडाही तसा तापलेलाच आहे. यंदा पावसाने लहरीपणा केल्याने मराठवाड्यातल्या बहुसंख्य तलावांतले पाणी आटलेले आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच असे तापमान निर्माण झाल्याने या तलावांतले उरले सुरले पाणीही आटले आहे.

निदान अशा संकटात तरी लोकांना आपल्या सहभागातून जलसंधारण केले पाहिजे असे वाटेल अशी आशा आहे पण तसे काही होताना दिसत नाही. अजूनही लोकांना अशा टंचाईतून मुक्तता करून घेण्याचा मार्ग आपल्या हातातच आहे याची जाणीव झाली आणि ते त्या प्रेरणेतून कामाला लागले तर आपण अशा टंचाईतून कायम मुक्त होऊ शकतो. अर्थात लोकांना ते पटले पाहिजे. पाण्याची टंचाई निवारणे हे केवळ सरकारचेच कर्तव्य आहे असा समज करून घेऊन त्यासाठी सातत्याने सरकारवरच टीका करीत बसण्याने काहीही निष्पन्न होणार नाही हे एकदा लोकांना समजले पाहिजे. त्यांना या बाबतीत स्वयंसेवी संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनी जागे केले पाहिजे. तसे होत नाही ही खेदाची बाब आहे. एकंदरीत उन्हाळा त्रस्त करीत आहे. उन्हाचा तडाखा १४ आणि १५ मे असे दोन दिवस कमी झाला होता आणि आता तापमान घटत येईल अशी आशा वाटली होती. दरवर्षी असेच घडते.

एप्रिल महिन्याचा शेवट आणि मे चा पूर्वार्ध कमालीचा कडक उन्हाचा असतो आणि मे महिन्याचे दोन आठवडे संपले की तापमान घटायला लागून वळवाच्या पावसाची चाहूल लागते. यंदा तसेच वाटले होते. त्याला पूरक बातम्याही आल्या होत्या. मोसमी पावसाचे ढग यंदा अंदमान बेटावर १ जूनलाच पोचणार अशाही बातम्या होत्या आणि काही बातम्यांत तर तो तिथे १ तारखेच्या आतच पोचणार असेही म्हटले होते पण हा सारा अंदाज फोल ठरला. तो खरा ठरला असता तर आता वळवाच्या पावसाचे आगमन होऊन लोकांची मने मृद्गंधाने मोहित व्हायला हवी होती पण तसे अजून तरी घडले नाही. वळवाचा पाऊस येण्याच्या ऐवजी तापमानात वाढ झाली. दिलासा मिळण्याऐवजी त्रास वाढला. एवढेच होऊन थांबले असते तर बरे झाले असते पण तापमानाने या वाढलेल्या मुक्कामातच नवे नवे विक्रम प्रस्थापित करायला सुरूवात केली. मे च्या मध्यात असे विक्रम झाले नव्हते आणि तिथून उन्हाळा उताराला लागण्याची अपेक्षा होती. यंदाचा उन्हाळा फारसा तापलाच नाही असेही वाटायला लागले होते पण वाढलेल्या आणि लांबलेल्या उन्हाळ्यातच तापमानाने विक्रम प्रस्थापित करायला सुरूवात केली. याच वाढलेल्या काळात उष्माघाताचे बळी पडायला सुरूवात झाली. आपल्या देशात नैसर्गिक आपत्तींमध्ये बळींची संख्या वाढते. खरे तर हे बळी आपत्तीचे नसतात तर ते गरिबीचे असतात. थंडीतही नेहमी असे म्हटले जाते. थंडीने कुडकुडून अनेक लोक मरण पावतात. खरे तर त्यांना आसरा नसतो आणि पुरेसे गरम कपडे नसतात म्हणून ते मरत असतात. तोच प्रकार उन्हाचा असतो. ऊन कितीही कडक असो. पोटासाठी त्या उन्हाच्या तडाख्यातही काही लोकांना बाहेर पडावे लागते. सुस्थितीतला माणूस या उन्हात बाहेरही पडणार नाही कारण अशा उन्हात बाहेर पडले नाहीत तरीही त्यांच्या पोटांची काळजी नसते. गरिबांना तसे परवडत नाही. आपल्या देशात थंडी असो की उन्हाळा असो गरिबी त्यांना बळीच पडते.

Leave a Comment