अच्छेे दिनचे झाले काय ?

modi
भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर येऊन आता पहिले वर्ष पूर्ण झाले आहे. सरकार या वर्षाभरातल्या कामांचा आढावा घेताना मोठे दावे करणारच. पण कॉंग्रेसच्या नेत्यांचे मत विचाराल तर ते नेमके त्याच्या विरोधात आहे. त्यांच्या मते सरकारने काहीच केले नाही. आपल्या लोकशाहीत विरोधी पक्षांनी सरकार जे काही म्हणेल त्याला विरोधच केला पाहिजे असे ठरून गेले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने सरकारचे एक वर्ष बिनकामाचे गेले असल्याची टीका करणे साहजिक आहे पण ती करतानाही नेमके मुद्दे समोर आणले तर त्या म्हणण्यातली तर्कशुद्धता मतदारांच्याही मनाला भावेल आणि लोकांच्या मनात विरोधी पक्षांविषयी आदरही वाढेल. पण कॉंग्रेसचे नेते याबाबत म्हणावे तेवढे सजग नाहीत. म्हणून तर्काला सोडून टीका करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यातल्या त्यात मोदी सरकारच्या शपथग्रहणाचा स्मृतिदिन साजरा करण्याची कॉंग्रेसची कल्पना या पक्षाच्या कोतेपणाची निदर्शक आहे.

मोदी सरकारने वर्षात काहीच केले नसते तरीही कॉंग्रेसतर्फे केला जाणारा हा स्मृतिदिन कॉंग्रेसच्या प्रतिष्ठेला न शोभणारा ठरला असता. मोदी सरकारने चांगले काम केले असल्यामुळे तर या स्मृतिदिनात कोतेपणाबरोबरच कॉंग्रेस नेत्यांची निराशाही दिसून येत आहे. कॉंग्रेसकडून मोदी सरकारवर केल्या जाणार्‍या टीकेत सातत्य नसल्याने तर कॉंग्रेसचे नेते फारच उघडे पडत आहेत. नरेन्द्र मोदी यांनी जनधन योजना जाहीर केल्यावर आणि अन्यही काही योजनांची घोषणा केल्यानंतर याच कॉंग्रेसच्या नेत्यांनी, या सगळ्या कॉंग्रेसच्याच योजना आहेत आणि त्या मोदी केवळ अंमलात आणत आहेत असा कल्ला केला होता. यातली टीका खरी आहे असे वादासाठी मानले तरी, या टीकेत मोदी काहीतरी करीत आहेत हेच दिसून येते. असे जर आहे तर मोदींनी वर्षभरात काहीच केले नाही असे कसे म्हणता येईल आणि मोदी सरकारचा स्मृतिदिन पाळणे किती सयुक्तिक ठरेल? याच कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदी सतत परदेशी दौर्‍यावर असतात असाही आरडाओरडा केलेला आहे. ते फारच परदेशात वावरतात अशी कॉंग्रेसच्या नेत्यांची टीका आहे. ही टीका प्रमाण मानली तरीही मोदी परदेशी जातात ते काही काम करण्यासाठीच जातात असे मानावे लागते आणि त्यांनी वर्षात काहीच केले नाही या टीकेतही काही अर्थ रहात नाही. गेला आठवडाभर देशातल्या काही माध्यमांनी मोदी सरकारच्या एक वर्षाविषयी काही सामान्य माणसांची मते आजमावली आहेत. त्यावरून असे दिसते की, लोकांना सरकार नावाच्या यंत्रणेच्या मर्यादा कळतात.

मोदींनी निवडणुकीत अच्छे दिन येतील असे आश्‍वासन दिले होते तरीही एवढ्या लहान कालावधीत अच्छे दिन येत नाहीत हे लोकांना कळते. लोकांना अच्छे दिन यावयाचे असतील तर काही कायदे करावे लागतात. भारतातली अशा कायद्यांची अंमल बजावणी करण्याची यंत्रणा आणि व्यवस्था वेळखाऊ आहे. त्यामुळे अच्छे दिन येण्यास अजून काही काळ लागू शकतो. आपण एका वर्षात केवळ हेच पाहू शकतो की, येत्या दोन तीन वर्षात अच्छे दिन यावेत या दृष्टीने मोदी यांनी पहिल्या वर्षाभरात जे काही करणे अपेक्षित होते ते त्यांनी केले आहे की नाही ? अच्छे दिन आले की नाही हे आज पहाण्यात काही हंशील नाही. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे की नाही हे पाहिले पाहिजे. पहिल्या वर्षातली वाटचाल त्या उद्दिष्टाच्या दिशेने होत आहे हे नक्की आहे. म्हणूनच निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन अतिशयोक्त विरोधी टीका करणार्‍यांच्या वावदूक टीकेची दखल न घेता आपण नि:पक्षपातीपणाने परीक्षण करणार्‍या तज्ञांचा अभिप्राय पाहिला पाहिजे. अशा लोकांनी सरकारची वाटचाल योग्य दिशेने आणि पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारपेक्षा अधिक गतीने सुरू असल्याची ग्वाही दिली आहे.

सरकारला दोन विधेयके मंजूर करता आली असती तर आर्थिक विकासाकडे अधिक वेगाने पावले टाकता आली असती पण ती विधेयके मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत सरकारकडे नसल्याने तिथे सरकारला कॉंग्रेसच्या अडेलतट्टूपणापुढे नमते घ्यावे लागले. त्यातले एक विधेयक आहे ते भूमिअधिग्रहणा संबंधीचे आणि दुसरे आहे ते जीएसटी या कराविषयीचे. जीएसटी कर हा देशाच्या विकासासाठी फार गरजेचा आहे. तो लागू झाला तर सरकारसमोरचे करवसुलीचे अनेक प्रश्‍न सुटणार आहेत. हा कायदा आधीच्या कॉंगे्रेस सरकारने प्रस्तावित केला होता पण भाजपाने त्याला विरोध केला. आता भाजपाने हा कायदा करण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्याला कॉंग्रेसचा विरोध होत आहे. या दोन्ही पक्षांनी देशाचा विचार करून या कायद्याला अंतिम स्वरूप दिले पाहिजे पण तसे होत नाही. भूमि अधिग्रहण कायद्याच्या बाबतीतही असेच होत आहे. भाजपाने या संबंधात कॉंग्रेसचेच विधेयक थोडाफार फरक करून मांडले आहे पण कॉंग्रेसने त्याकडे भाजपाला भांडवलदारांचा हस्तक ठरवण्याची संधी म्हणून पहायला सुरूवात केली आहे आणि त्याला विरोध केला आहे. अशा काही अडचणी असल्या तरीही भाजपा सरकारची वर्षभरातली वाटचाल समाधान कारक आहे. या सरकारची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे गेल्या वर्षभरात सरकारमधल्या एकाही मंत्र्यावर कोणालाही भ्रष्टाचाराचा साधा आरोपही करता आलेला नाही. ही काही सामान्य उपलब्धी नाही.

Leave a Comment