हिमालयाच्या कुशीत वसलेले शांत सुंदर कसौनी

kausani
उत्तराखंडच्या कुमाऊं भागातून हिमालयाचे जे सौंदर्य पहायला मिळते ते अन्यत्र कुठून क्वचितच दिसत असेल. कुमाऊंतील कसौनी हे लहानसे स्थळ तर यासाठी विशेष प्रसिद्ध असून अल्मोडापासून हे ठिकाण केवळ ५२ किमीवर आहे. समुद्रसपाटीपासून १८९० मीटर उंचीवर असलेले हे लहानसे पण अतिसुंदर आणि शांत ठिकाण निसर्गवेड्यांसाठी तसेच मनशांती हवी असणार्‍यांसाठी अतिशय योग्य असे पर्यटन स्थळ आहे.

कसौनीतून हिमालयाच्या अनेक रांगाचे सुंदर दर्शन घडतेच पण येथील मैलोनमैल पसरलेल्या चहाच्या बागा डोळ्यांना गारवा देतात. येथील मंदिरे आणि अनासक्ती आश्रम थकल्या भागल्या मनालाही शांती देतात. ट्रेकर्ससाठी आणि अगदी पायी चालण्याची हौस असलेल्यांसाठी येथील जंगलवाटा आनंदवाटा होऊन जातात. विशेष म्हणजे येथून नंदादेवी, माऊंट त्रिशूळ, नंदाकोट, नीळकंठ शिखराचे अत्यंत अद्भूत दर्शन होते.

हे गांव दोन भागात विभागले गेले आहे. वरच्या भागात हॉटेल, आश्रम अशी निवासस्थानांची व्यवस्था आहे तर खालच्या भागात आहे मुख्या बाजार. वरच्या भागातील अनासक्ती आश्रमात म.गांधी कांही काळ राहिले होते आणि येथेच त्यांनी गीतेच्या श्लोकांचे भाषांतर केले जे अनासक्ती योग म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय हे प्रसिद्ध कवी सुमित्रानंदन पंत यांचे जन्मगांव आहे. आश्रमात मनशांतीसाठी अनेक पर्यटन आवर्जून येतात.
kausani-1

गावापासून साधारण १६ किमीवर वैजनाथ मंदिर समूह आहे. ९ ते १२ व्या शतकात ही मंदिरे बांधली गेली असून त्यांचे बांधकाम कुमाऊंच्या राजाने केल्याचे सांगितले जाते. नागरशैलीतील ही १७ मंदिरे आहेत. त्यात मुख्य मंदिर वैजनाथ शंकराचे आहे. अन्य देवळांत केदारेश्वर, लक्ष्मीनारायण, ब्राह्मणीदेवी यांच्या मंदिरांचा समावेश आहे. रेस्ट हाऊसपासून सरला ट्रेक रस्ता सुरू होतों. निसर्गसौंदर्य न्याहाळताना आपण कधी दाट जंगलात पोहोचलो हे लक्षातही येत नाही. २०८ हेक्टर क्षेत्रात पसरलेले चहाचे मळे डोंगररांगा आणखी देखण्या आणि हिरव्यागार करून टाकतात,

येथे जाण्यासाठी मार्च ते नोव्हेंबर हा सिझन चांगला आहे. आक्टोबर नोव्हेंबरमध्ये गेल्यास निळ्याभोर आकाशाखाली पसरलेल्या हिमालयाच्या शुभ्र पर्वतरांगा नजरेचे पारणे फेडतात. येथे राहण्यासाठी कुमाऊं मंडळ विकास निगमची रेस्ट हाऊस आहेत तशीच अन्य छोटी रिसॉर्टही खूप संख्येने आहेत. येथे राहणे कमी खर्चात होऊ शकते.

Leave a Comment