चिनी सरकारकडून ई-व्हिसा निर्णयाचे स्वागत

e-visa
बीजिंग : नुकताच चीनचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्या वेळी त्यांनी भारतात पर्यटनासाठी येणा-या चीनच्या नागरिकांना ई-व्हिसा देण्याची घोषणा केली होती. मोदींच्या या निर्णयाचे चीनकडून स्वागत करण्यात आले असून या प्रकरणी आमच्या कायद्यानुसार भारतासोबत योग्य प्रकारे सहकार्य केले जाईल, असा आशावाद चीन सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते हाँग लेई यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या पर्यटकांच्या सोयीसाठी केलेली घोषणा ही स्वागतार्ह असून यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांची पर्यटनाच्या दृष्टीने आदानप्रदान होईल आणि नवविकासाची नांदी येईल. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, पंतप्रधान केगियांग आणि नॅशनल पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष झँग डेजियांग यांच्याशी मोदी यांनी यशस्वी चर्चा केली. त्यांच्या चर्चेदरम्यान द्विपक्षीय मुद्यांवर व्यापक आणि धोरणात्मक अशी चर्चा घडून आली, असेही हाँग यांनी या वेळी सांगितले.

हाँग यांनी दोन्ही देशांच्या संबंधावर प्रकाश टाकत ही एका नव्या पर्वाची नांदी असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांचे संबंध उच्च पातळीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी चीन दौ-यात २२ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचे २४ करार केले. हे करार दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे असून त्यामुळे विकासाचे नवे पर्व अस्तित्वात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment