जॉर्ज वॉशिग्टन विद्यापीठात स्वस्तिकावर बंदीचा विचार

swastik
अमेरिकेतील प्रतिष्ठीत विद्यापीठात गणल्या जाणार्‍या जॉर्ज वॉशिग्टन विद्यापीठात हिंदू आणि बौद्ध धर्मातील पवित्र समजले जाणारे स्वस्तिक चिन्ह लावण्यावर बंदी घालण्यासंदर्भातील विचार सुरू असल्याचे समजते. हे चिन्ह नाझींच्या चिन्हासारखे भासते व त्यामुळे विद्यापीठातील ज्यू विद्यार्थ्यांच्या भावनांना धोका पोहोचतो असे कारण त्यामागे असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एका ज्यू मुलाने भारत यात्रेवरून परत जाताना स्वस्तिक चिन्ह असलेला फोटो नेला व तो हॉस्टेलमधील हॉलमध्ये लावला. मात्र हा फोटो पाहताच अन्य ज्यू विद्यार्थी एकदम घाबरले व कांही तरी धोका असल्याची त्यांची भावना झाली. त्यांनी त्वरीत पोलिसांना पाचारण केले. मात्र पोलिस तपासात कांहीही धोका नसल्याचे स्पष्ट झाले तसेच या विद्यार्थ्यानेही हा फोटो भारतातून आणल्याचा खुलासा केला मात्र विद्यापीठाने अशी संशयास्पद वाटणारी चिन्हे विद्यापीठ आवारात लावण्यावरच बंदी घालण्याचा विचार सुरू केल्याचे विद्यापीठाचे प्रमुख स्टीव्हन नॅप यांनी सांगितले. संबंधित विद्यार्थ्याचीही पुन्हा चौकशी केली जात आहे असेही ते म्हणाले.

Leave a Comment