व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

management
पुणे – तंत्रशिक्षण संचालनालयाने राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना या परीक्षेत निम्म्यापेक्षाही म्हणजे १०० पेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे महाविद्यालये भरण्यासाठी गुणवत्तेशी तडजोड करावी लागण्याचीच शक्यता आहे. या परीक्षेत ५ विद्यार्थी १७० गुण मिळवून अव्वल ठरले आहेत.

राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रमाला आता पुन्हा एकदा बरे दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षापासून व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली होती. मात्र, त्यानंतर संस्थांनी अभ्यासक्रम बंद करण्यास सुरवात केली. त्यामुळे गेल्या दोन वर्षात अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमताही घटली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील जीमॅटसारख्या प्रवेश परीक्षेऐवजी गेल्या वर्षीपासून राज्याची स्वत:ची प्रवेश परीक्षा सुरू झाली. त्यातच किमान गुणांची अटही काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी राज्यातील साधारण ४५ हजार जागांसाठी ५७ हजार २२४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

Leave a Comment