इबोलाच्या नव्या लसीची यशस्वी चाचणी

ebola
बीजिंग – गेल्यावर्षी आफ्रिकेसह जगाच्या इतर काही भागांमध्ये थैमान घालणार्‍या इबोला या आजारावर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीची मनुष्यावर करण्यात आलेली पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरली आहे.

ही नवी लस बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि तिनांजिन कॅनसिनो बायोटेक्नॉलॉजी या दोन संस्थांनी मिळून विकसित केली असून, याची प्राथमिक चाचणी यशस्वी ठरली आहे, असे द लॅन्सेट नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. इबोलावरील लसींच्या आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व चाचण्या १९७६ मध्ये झैरे येथे आलेल्या इबोलाच्या साथीवर आधारित होत्या.

या लसीच्या आतापर्यंत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार मनुष्यावर ही लस यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे, असे जियांग्सू प्रांतातील रोत प्रतिबंधक आणि नियंत्रण केंद्रातील आघाडीचे संशोधक फेंगसाई झू यांनी सांगितले. या लसीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही खूप स्थिर आणि आफ्रिकेसारख्या थंड वातावरणात ठेवण्याची क्षमता नसलेल्या भागातही ती सहजपणे जपून ठेवता येते. चीनच्या जियांग्सू प्रांतातील ताईझोऊ भागातील एका केंद्रात ही चाचणी घेण्यात आली. चाचणीसाठी १२० निरोगी प्रौढ चिनी लोकांची निवड करण्यात आली होती. लस दिल्याच्या २८ दिवसांनंतर कमी क्षमतेचा डोज दिलेल्या ४० पैकी ३८ आणि उच्च क्षमतेचा डोज दिलेल्या सर्व ४० जणांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्याचे अभ्यासात आढळून आले. पहिल्या टप्प्यात ही चाचणी यशस्वी झाली असली तरी याच्या आणखी काही चाचण्या घेण्याची गरज आहे, असेही झू यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment