नववा दुर्मिळ पांढरा हत्ती म्यानमारमध्ये आढळला

elephant
यॉंगॉन – म्यानमारच्या पश्‍चिमेकडील अय्यरवाडी प्रांतातील जंगलात या देशाच्या वनाधिकार्‍यांनी दुर्मिळ असा पांढरा हत्ती पकडला आहे. या हत्तीचे वय सात वर्षांचे असून, सहा आठवड्यांपूर्वी तो सर्वप्रथम या जंगलातील एका भागात आढळून आला होता. तेव्हापासून वनाधिकार्‍यांची त्याच्यावर बारीक नजर होती. गेल्या शुक्रवारी त्याला पकडण्यात यश आले.

आम्ही त्याची विशेष काळजी घेत आहोत. आमच्याकडून त्याला कोणतीही इजा होणार नाही आणि या हत्तीकडूनही आमच्या अधिकार्‍यांना कोणताच धोका उद्‌भवणार नाही, याची पूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. सध्या म्यानमारच्या ताब्यात आठ पांढरे दुर्मिळ हत्ती असून, यातील पाच हत्ती नैपिथाव येथील प्राणिसंग्रहालयात आणि अन्य तीन हत्ती यॉंगॉन येथील प्राणिसंग्रहालयात आहेत.

हा दुर्मिळ पांढरा हत्ती म्यानमार, थायलंड, लाओस आणि इतर आशियाई देशांमध्येच आढळून येतो. साधारणपणे हत्तींचा रंग फिक्कट गुलाबी किंवा जांभळा असतो. त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या पांढर्‍या असतात आणि नखे मोठी असतात. पूर्वीच्या काळात राजघराण्यांमध्ये वैभवाचे प्रतीक म्हणून हत्ती पाळले जात होते. तर, अनेकांना अजूनही असा विश्‍वास आहे की, हत्तीमुळेच देशात चांगले दिवस येतात.

Leave a Comment