नवरातिलोवाचा समलैंगिक विवाह

navaratilova
न्यूयॉर्क – अमेरिकेची महान टेनिसपटू मार्टिना नव्रातिलोवाने वयाची साठी गाठायला दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असताना आपली मैत्रीण ज्युलिया लेमिगोवासोबत समलैंगिक विवाह केला आहे. समलैंगिकांच्या विवाहाला मंजुरी असलेल्या न्यूयॉर्क शहरात नुकताच हा विवाहसोहळा पार पडला असल्याचे वृत्त आहे.

आपली मैत्रीण ज्युलिया लेमिगोवाला सप्टेंबर महिन्यात अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेदरम्यान मार्टिनाने सर्वांसमोरच लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. एका गुडघ्यावर बसून तिने ज्युलियाला लग्नाची मागणी घातली होती. हा प्रस्ताव ज्युलियानेही आनंदाने मान्य केला होता. तेव्हापासूनच दोघांचेही चाहते त्यांच्या विवाहाची वाट पाहात होते. अखेर सोमवारी हे दोघेही विवाहबद्ध झाले.

समलैंगिक म्हणून आयुष्य जगताना माझाही कधी विवाह होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. आज वयाच्या ५८ व्या वर्षी तो क्षण माझ्या आयुष्यात आला आहे. हे माझे पहिलेच लग्न आहे आणि मी खूप समाधानी आहे, अशी भावना मार्टिनानं विवाहानंतर व्यक्त केली. समलैंगिकांच्या विवाहाला कायदेशीर मंजुरी मिळावी, असे मला दहा वर्षांपासून वाटत होते, असेही तिने सांगितले.

Leave a Comment