‘डूडल सोशल ऍडफेस्ट २०१५’चे आयोजन

doodle
मुंबई: जाहिरात क्षेत्रातील कलाकार आणि विद्यार्थी यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच कलेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मंथन आर्ट फौंडेशन’च्या वतीने मुंबई व पुणे येथे ‘डूडल ऍडफेस्ट २०१५’चे आयोजन केले आहे. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. जाहिरात क्षेत्रातील कलाकार आणि विद्यार्थी यांना आपले ज्ञान अद्ययावत करण्याची संधीही या महोत्सवाद्वारे उपलब्ध होणार आहे; अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. शशिकांत गवळी यांनी दिली.

मुंबई येथे दि. २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान होणा-या या महोत्सवात जाहिरात आणि उपयोजित कलेच्या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ व्याख्याने आणि कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार असून त्यामधून या क्षेत्रात कार्यरत असलेले कलाकार आणि उपयोजित कलांचे विद्यार्थी यांना या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाची, आधुनिक तंत्रज्ञानाची आणि नव्या शैलींची माहिती उपलब्ध होणार आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक संदेश देणा-या भित्तिचित्र (पोस्टर्स) आणि दृक्-श्राव्य जाहिरातपटांच्या ( ऍडफिल्म्स) राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा जाहिरात क्षेत्रातील कलाकार आणि विद्यार्थी; अशा दोन गटात होणार असून यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील उल्लेखनीय भित्तिचित्र आणि जाहिरातपटांचे या महोत्सवादरम्यान प्रदर्शनही करण्यात येणार आहे. या महोत्सवातील सर्व उपक्रम आणि स्पर्धेत सर्वांना विनाशुल्क सहभागी होता येईल. त्यासाठी १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या दरम्यान www.doodleadfest.com या संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची भित्तिचित्र आणि जाहिरातपट विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या स्वयंसेवी संस्थाना विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचा उपयोग अनेक सामाजिक समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच संस्थांच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी करता येऊ शकेल. त्यासाठी सामाजिक काम करणा-या संस्थांनी संपर्क साधावा; असे आवाहनही प्रा. गवळी यांनी केले.

Leave a Comment