सुरक्षित हेल्मेटला क्रिकेटपटूंकडून मागणी वाढली

phil
ऑस्ट्रेलियाचा तरूण खेळाडू फिल ह्यूज याच्या डोक्याला उसळता चेंडू लागून झालेल्या दुखापतीत त्याचा मृत्यू ओढविल्याची घटना अगदी ताजी असतानाच भारतीय क्रिकेटपटूंकडून सुरक्षित हेल्मेटची मागणी वाढली असल्याचे दिसून आले आहे. ह्यूज याने जुने हेम्लेट वापरले आणि उसळता चेंडू त्याच्या मानेमागे लागून त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्याच्या मृत्यूबद्दल सर्व थरातील खेळाडूंकडून दुःख व्यक्त केले जात असतानाच खेळाडू आता आपल्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक बनल्याचे दिसून येऊ लागले आहे.

भारतीय रणजी खेळाडूंनीही सुरक्षित हेल्मेटला प्राधान्य दिले असून युवा क्रिकेटपटू उम्मुक्तचंद याने त्याला हेल्मेट पुरविणारया कंपनीकडे सुरक्षित हेल्मेटची मागणी केल्याचे सांगितले. मसुरी कंपनीची नवी हेल्मेट अधिक सुरक्षित आहेत कारण ती कानाच्या खालच्या भागापर्यंत येतात आणि मानेलाही त्यामुळे संरक्षण मिळते असे तो म्हणाला.

माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यानेही हयूज याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे त्याचबरोबर खेळाडूंना अत्याधुनिक हेल्मेट हवीत असेही मत व्यक्त केले आहे. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार हेल्मेट वापरात आल्यापासून दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण उसळता चेंडू येत असेल तर हेल्मेट नसताना येणारी प्रतिक्रिया त्वरीत येते तर हेल्मेटमुळे ती थोडी उशीरा होते. स्वतःच अनुभव सांगताना ते म्हणाले की मलाही एकदा हेल्मेट नसताना उसळता चेंडू लागला होता पण मी हेल्मेट वापरू लागलो तेव्हापासून चार ते पाच वेळा चेंडू माझ्या डोक्यावर आदळले. मार्शलच्या चेंडूमुळे तर हेल्मेटला तडेही गेले होते. अर्थात फलंदाजाने सावधगिरीने फलंदाजी करणे गरजेचे आहेच. गोलंदाजावर उसळते चेंडू टाकू नका अशी बंधने घातली तर खेळातील चुरस संपून जाण्याची भीती आहे.

Leave a Comment