उणे ५८ अंश तापमानात प्रवाशांनी ढकलले विमान

viman
सैबेरिया- रस्त्यात बंद पडलेल्या कारला धक्का मारून ढकलणे हा प्रकार जगात सर्वत्र पाहायला मिळतो. भारतासारख्या देशात बस बंद पडणे आणि प्रवाशांंनी ती ढकलून नेणे हाही कॉमन प्रकार आहे. मात्र विमान ढकलून रनवेवर आणल्याचे आजपयर्ंत तरी ऐकिवात नव्हते. सैबेरियातील विमानतळावर हा अद्भूत प्रकार नुकताच घडला. विशेष म्हणजे उणे 58 डिग्री तापमान असतानाही विमानातील प्रवाशांनी हा चमत्कार घडवून दाखविला.

मिळालेल्या माहितीनुसार सैबेरियातील इगास्का विमानतळावर मंगळवारी रात्री एक विमान ब्रेक जॅम झाल्याने अडकले होते. वैमानिक पार्किंग ब्रेक टेक ऑफ करायला विसरल्याने हा प्रकार घडला मात्र त्यामुळे विमान जागचे हलेनाच. त्यात ज्या पट्टीवर विमान उभे डोते तेथेही प्रचंड बर्फ होते. त्यासाठी टो ट्रक आणला गेला मात्र हा ट्रकही विमान हलवू शकला नाही. अखेर विमानातील प्रवासी खाली उतरले. भरभक्कम ओव्हरकोट घातलेल्या या प्रवाशांनी एकमेकांना स्फूर्ती देत विमान ढकलण्यास सुरवात केली. जोर लगाके, हैश्शा अशा आरोळ्याही दिल्या असतील. मात्र जे कांही असेल ते विमान जागेवरून हलले आणि टॅक्सीवेवर आणण्यात प्रवासी यशस्वी झाले.

जुलैत जपानमध्येही प्रवाशांनी अशी एकजूट दाखवून रेल्वे उचलण्याची किमया केली होती. टोक्योमध्ये रेल्वेस्टेशनवर एक महिला रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्येच पडली. तेव्हा प्रवाशांनी चक्क एकाबाजून रेल्वे उचलून महिलेचा जीव वाचविला होता.

Leave a Comment