चीनच्या लेनोव्होचा मोटोरोलावर ताबा

moto
बीजिंग – स्मार्टफोन उत्पादक कंपनी मोटोरोला मोबिलिटीवर चीनमधील संगणक उत्पादक कंपनी लेनोव्होने आपली अधिकृत मालकी प्रस्थापित केली आहे. गूगलकडून या कंपनीचा खरेदी व्यवहार पूर्ण करताना लेनोव्होने जागतिक स्मार्टफोनचा ब्रॅण्ड म्हणून नावलौकिक मिळविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

हा सौदा २.९ अब्ज डॉलर्समध्ये पूर्ण झाल्याचे लेनोव्होने सांगितले आहे. जगातील सर्वात मोठे ‘सर्च इंजिन’ अशी ओळख असलेल्या गूगलने २०१२ मध्ये मोटोरोला मोबिलिटी १२.४ अब्ज डॉलर्सला खरेदी केली होती. स्मार्टफोन बाजारपेठेत दबदबा वाढविण्यासाठी घेतलेला हा खरेदीचा निर्णय गूगलला फारसा लाभदायक ठरला नाही. यानंतर या कंपनीचा ‘सेट-टॉप ऑपरेशन’ विभाग एरिस ग्रुप इंकला २.३५ अब्ज डॉलर्सला विकण्यात आला. तर स्मार्टफोनचा व्यवसाय २ हजार पेटंटसह लेनोव्होला विकण्यात आला आहे.

लेनोव्होने जानेवारीत मोटोरोलाच्या खरेदी व्यवहाराची घोषणा केली होती. त्यावेळी या कंपनीचे अध्यक्ष यांग यॉंगकिंग यांनी स्मार्टफोनच्या बाजारपेठेत प्रमुख प्रतिस्पर्धी होण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली होती.

Leave a Comment