जाहिरात व्यवसाय

agency
जाहिरातीचा व्यवसाय करणार्‍या फार मोठ्या कंपन्या भारतात आहेत. त्यांची या धंद्यातली गुंतवणूक अक्षरशः अब्जावधी रुपये आहेत आणि त्यांची कमाईसुध्दा करोडो रुपये आहे. त्यामुळे जाहिरात व्यवसाय म्हटल्याबरोबर प्रचंड गुंतवणुकीचा मुद्दा समोर येतो. प्रत्यक्षात लहान प्रमाणावर हा व्यवसाय करायचाच झाला तर त्याला फारशी गुंतवणूक लागत नाही किंबहुना कसलीही गुंतवणूक न करताही हा व्यवसाय सुरू करता येतो. छोट्या प्रमाणावर हा धंदा करण्याची कल्पकता एका तरुणाने दाखवली आणि त्याच्या कल्पकतेचे खरोखरच कौतुक झाले. जाहिरात करण्याचे प्रकार तर खूप आहेत. मात्र त्याने दिवाळी अंक हे माध्यम जाहिरातीसाठी वापरले. एखाद्या दिवाळी अंकामध्ये साधी किंवा रंगित जाहिरात द्यायची असेल तर त्याला खूप पैसे लागतात. मात्र ती जाहिरात त्या दिवाळी अंकाच्या खपाच्या व्यापक क्षेत्रातल्या ग्राहकांपर्यंत जाते. एखाद्या छोट्या उद्योजकाला दिवाळी अंकात जाहिरात देणे परवडत नाही आणि त्याला तशी गरजही नसते. कारण त्याचे ग्राहक स्थानिक असतात.

तेव्हा दिवाळी अंकाच्या लोकप्रियतेचा वापर करून कमी पैशात पण आपल्या मर्यादित क्षेत्रापुरती जाहिरात कशी करता येईल याचे उदाहरण या तरुणाने घालून दिले. दिवाळी अंक बाजारात आले की काही ठराविक लोक काही ठराविक दिवाळी अंक पैसे देऊन विकत घेतात आणि तो दिवाळी अंक त्यांच्या घरापुरताच मर्यादित राहतो. मात्र महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंकाच्या वाचनाची सुद्धा एक वेगळी परंपरा आहे. एखाद्या वाचनालयामध्ये जवळपास १०० दिवाळी अंक विकत घेतले जातात आणि ठराविक वर्गणी घेऊन ते दिवाळी अंक वाचनालयातल्या पुस्तकांप्रमाणे ग्राहकांना आलटून पालटून वाचायला दिले जातात. दिवाळी अंक निघाल्यापासून जवळपास चार-पाच महिन्यांपर्यंत ते वितरित होत राहतात आणि साधारणत: त्यातला प्रत्येक दिवाळी अंक निदान दीड-दोनशे कुटुंबात तरी एवढा काळपर्यंत फिरत राहतात. अशा दिवाळी अंकांना पुठ्ठे घातले जातात.

एका कल्पक तरुणाने दिवाळी अंकाच्या वाचनालयांना स्वत:च पुठ्ठे पुरवले आणि त्या पुठ्ठ्यांवर स्थानिक स्वरूपाच्या जाहिराती छापल्या. जाहिराती छापल्यामुळे जाहिरातदारांचा फायदा झाला आणि वाचनालयाला फुकट पुठ्ठे मिळाले. काही काही दिवाळी अंकांना दोन-तीन पुठ्ठे घातले गेले आणि त्यांच्यावर साधारणत: ३०-३२ जणांच्या जाहिराती छापून आल्या. या जाहिरातदारांमध्ये ट्युशन क्लास, मिठाईची दुकाने, बेकरी, बिल्डर्स, रुग्णालये, रेडिमेड कापडाची दुकाने अशा स्थानिक जाहिरातदारांच्या जाहिराती होत्या. दिवाळी अंकाच्या आत जाहिरात छापण्यासाठी लागणार्‍या पैशाच्या मानाने किती तरी कमी दरामध्ये ही जाहिरात छापली गेली. आपल्याच गावामध्ये आपल्या ग्राहकांच्या क्षेत्रात जाहिरात गेल्यामुळे त्याचा उपयोगही झाला. ही युक्ती राबविणार्‍या तरुणालाही साधारणत: ६०-७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळून गेले. जाहिरात क्षेत्राच्या बाबतीत असे लक्षात आलेले आहे की, मोठ्या प्रमाणावर आणि व्यापक क्षेत्रात जाहिरातीचा व्यवसाय करायचा असल्यास त्याला प्रचंड मोठे भांडवल गुंतवावे लागते. परंतु स्थानिक बाजारपेठेपुरती जाहिरात करायची असल्यास फार गुंतवणूकही नसते आणि अशा जाहिरातीला दरही फारसा लागत नाही. त्यामुळे जाहिरातदारांचा प्रतिसाद मिळतो.

एका तरुणाने आपले दुचाकी वाहन अशा पद्धतीने सजवून घेतलेले आहे की, त्याच्या दोन्ही बाजूला जाहिराती लावता येतात. या वाहनावर जाहिरात देणार्‍यांना तो काही ठराविक रक्कम आकारतो आणि वाहनावर दिवसभर फिरत राहतो. थोडा वेळ मिळाला की, गर्दीच्या ठिकाणी एका कोपर्‍यात उभा राहतो. हा सारा खर्च जाहिरातदार कंपन्याच करतात. स्थानिक जाहिरातींच्या बाबतीत अनेक कल्पकतापूर्ण उपक्रम राबवता येतात. सध्याचा जमाना जाहिरातीचा आहे. जाहिरात न करणार्‍यांचा व्यवसाय चालणार नाही हे सर्व व्यावसायिकांना कळून चुकले आहे. परंतु वृत्तपत्रातल्या जाहिराती या फार महाग होत चालल्या आहेत. कित्येक छोट्या व्यापार्‍यांना आणि उद्योजकांना वृत्तपत्रातली जाहिरात परवडत नाही आणि त्यांना त्याची गरजही नसते. अशा व्यावसायिकांना स्थानिक पातळीवर आणि कमी पैशात जाहिरात करण्याची सोय उपलब्ध करून दिली तर त्यांचा व्यवसायही वाढतो आणि एक नवा स्वयंरोजगार त्यातून निर्माण होतो.

अशा जाहिरातींमध्ये ऑटो रिक्षाच्या मागच्या बाजूला लावल्या जाणार्‍या जाहिरातींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. रिक्षा दिवसभर शहराच्या विविध भागात फिरत राहतो आणि त्या त्या भागामध्ये रिक्षासोबत जाहिरातही जाऊन पोचते. स्थानिक स्वरूपाच्या जाहिरातीच्या व्यवसायात पडू इच्छिणार्‍या तरुणांनी थोडी कल्पकता दाखवून जाहिरातीचे नवे मार्ग शोधून काढले तर त्यांना चांगला व्यवसाय मिळू शकतो. सध्या आपण काही शहरांमध्ये घरांच्या फाटकावर, कुत्र्यांपासून सावध रहा, फाटकासमोर वाहने लावू नका अशा सूचनांचे फलक लावलेले बघत असतो. खरे म्हणजे सूचना हे एक निमित्त असते. सूचनेच्या खाली ती सूचना करणार्‍या एखाद्या कंपनीचे नाव दिलेले असते आणि सूचनेच्या आडून कंपनीने आपली जाहिरात केलेली असते. अशी युक्ती योजून अनेकांना आपण जाहिरातीचा मार्ग दाखवू शकतो आणि आपली कसलीही गुंतवणूक न करता एक व्यवसाय निर्माण करू शकतो.

Leave a Comment