वाहनतळ

parking
या पुस्तकात दिले गेलेले सगळे बिन भांडवली उद्योग हे प्रथमदर्शनी बिन भांडवली वाटत असले तरी त्या धंद्यामागे परमेश्‍वराने आपल्याला दिलेले, अगदी फुकट दिलेले एक भांडवल आपल्याला वापरावे लागते. ते भांडवल म्हणजे आपले कौशल्य किंवा आपल्याला जन्मतःच अवगत असलेली कला. त्या कलेचा वापर करून किंवा त्या कौशल्याचा वापर करून आपण आपला व्यवसाय उभा करू शकतो. अशा वेळी आपला छंदसुध्दा उपयोगी पडतो. जो आपला छंद असेल त्याचाच व्यवसाय करावा म्हणजे भांडवलाची गरज लागत नाही. मात्र काही उद्योग असे आहेत की ज्या उद्योगांना कसल्याच कौशल्याची गरज नाही. असा एक उद्योग म्हणजे वाहनतळ चालवणे. वाहनतळाचे दोन प्रकार आहेत. एखाद्या चित्रपट गृहासमोरचे, नाट्यगृहासमोरचे, रेल्वेस्थानकावरील रेल्वेच्या जागेवरचे वाहनतळ हा एक प्रकार. या प्रकारात आलेली वाहने सांभाळून त्या सांभाळण्याबद्दलचे भाडे घेतले जाते. परंतु या वाहनतळाविषयी जी माहिती उपलब्ध झाली आहे तिच्यानुसार अशी विशिष्ट ठिकाणचे वाहनतळ चालवणे हा बिनभांडवली धंदा नाही. कारण ज्यांच्या जागेत आपण वाहनतळ चालवतो त्यांच्याकडून वाहनतळाच्या जागेची निविदा काढली जाते आणि ज्याची निविदा मंजूर होईल त्याला भरपूर डिपॉझिट आकारून मगच ती जागा बहाल केली जाते. म्हणजे असे वाहनतळ फायदेशीर असतातच पण त्यासाठी डिपॉझिटची रक्कम भरावी लागते आणि तेवढी रक्कम आपल्या जवळ असावी लागते. अर्थात, ते मोठ्या लोकांचे काम आहे. एखाद्या साहसी तरुणाने जवळ पैसा नसतानाही काही युक्ती करून असा एखादा वाहनतळ मिळवलाच तर त्याला हा उत्तम व्यवसाय म्हणून करता येतोच. पण वाहनतळाचा दुसरा प्रकार त्या मानाने सोपा आणि खरोखर बिनभांडवली आहे.

आज काल अनेक लोक नोकरीच्या निमित्ताने दररोज एखाद्या गावाला अपडाऊन करत असतात आणि त्यांचा हा रोजचा प्रवास रेल्वे किंवा बसने होत असतो. परंतु आपल्या घरापासून रेल्वेस्थानकापर्यंत किंवा बसस्थानकापर्यंत ते आपल्या दुचाकी वाहनावर येतात आणि वाहन तिथल्या वाहनतळावर सोडून मग आपल्या नोकरीच्या गावाला जातात. गावातले येणेजाणे या व्यवस्थेमुळे सोपे जाते. त्यामुळे दुचाकी वाहनांचे वाहनतळ भरभरून चालले आहेत. वाहनांची संख्या वाढत चालली आहे. अपडाऊन करणार्‍यांचीही संख्या वाढत आहे. रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावरील त्यांच्या मालकीचे वाहनतळ अपुरे पडत आहेत. अशा वेळी या स्थानकांच्या परिसरात अन्य खाजगी वाहनतळांची गरज वाढायला लागली आहे. एखाद्या खाजगी जागेत किंवा छोट्याशा मैदानात त्याच्या मालकाला नाममात्र भाडे देण्याचे कबूल केले तर ती जागा उपलब्ध होऊ शकते. तिथे उभारल्या जाणार्‍या वाहनतळाला डिपॉझिट भरावे लागत नाही. म्हणजे तो वाहनतळ भांडवल नसतानाही उभा करता येतो. नोकरीच्या निमित्ताने रोज अपडाऊन करणारे सगळेच लोक बसस्थानकावरच बस पकडतात असे नाही. सध्या मोठ्या शहरांमधून शहराच्या विविध भागांमध्ये एस.टी. बसचे थांबे झाले आहेत आणि अपडाऊन करणारा कर्मचारी आपल्या घराला त्यातल्या त्यात जवळ पडेल अशा बस थांब्यावरून बस पकडायला लागला आहे. त्यामुळे अशा बसथांब्यांच्या परिसरातसुध्दा वाहनतळ उभारणीची गरज निर्माण झाली आहे. तिथे लहानसहान वाहनतळ फार भांडवल न गुंतवता उभारता येतात.

वाहनतळ ही केवळ बस आणि रेल्वेच्याच प्रवाशांची गरज नाही. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वाहने येतात. तिथेही तळाची सोय असावी लागते. विवाह समारंभ, जाहीर सभा, सर्कस, विविध मैदानांवर होणारी प्रदर्शने, आनंद यात्रा, जत्रा अशा विविध निमित्तांनी वाहनांची गर्दी होते आणि वाहने व्यवस्थित लावून घेणे त्यांच्यावर नजर ठेवणे त्यासाठी वाहनतळ कंत्राटदार आवश्यक ठरतो. एरवी सुध्दा भाजी मंडई किंवा शहरातली महत्त्वाची बाजारपेठ अशा ठिकाणी आतपर्यंत गाडी नेता येत नाही. अशावेळी पार्किंग झोन निर्माण केलेले असतात. तिथे वाहनतळ कंत्राटदार आवश्यक असतो. सध्या विविध महाविद्यालयात आणि शाळांमध्येसुध्दा विद्यार्थ्यांच्या गाड्यांना शेड उपलब्ध करून दिले जाते आणि त्या शेडवर संस्थेचा खर्च होतो म्हणून शिक्षणसंस्थासुध्दा पार्किंगचे शुल्क आकारायला लागल्या आहेत.अशा संस्थांमधून संस्थेला थोडेफार भाडे देऊन एखादा कंत्राटदार वाहनांच्या शेडवर लक्ष ठेवण्याचे काम करू शकतो. एकंदरीत वाहनांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे आणि वाहनांना जागा कमी पडायला लागली आहे. शिवाय एखाद्या कार्यक्रमाला जाताना बाहेर गाडी लावली तर परत येताना ती जागेवर असेलच याची खात्री देता येईनाशी झाली आहे. या परिस्थितीत वाहनतळ हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर गरजेचा झाला आहे. ज्याच्या मनात खरोखरच एकही पैसा न गुंतवता चांगला पैसा कमवण्याची तीव्र इच्छा असेल अशा माणसाला वाहनतळ हा एक छान व्यवसाय आहे. त्यात पैशाची गुंतवणूक तर नाहीच पण कसल्या कौशल्याचीही गरज नाही. विशेष म्हणजे या व्यवसायामध्ये कसल्या नफ्या तोट्याचा विचार नाही आणि फारशी जोखीमही नाही.

Leave a Comment