इसिस विरोधात लढण्यासाठी डच बायकर गँग सदस्य सिरीयात

dutch
इस्लामिक स्टेट सुन्नी दहशतवाद्यांनी सिरीया आणि इराकचा कांही भाग ताब्यात घेऊन इस्लामिक स्टेटची घोषणा केल्याला अनेक महिने लोटले असतानाच या दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी आणि कुर्दिश लढवय्यांना मदत करण्यासाठी नेदरलँडची डच बायकर गँग सज्ज झाली असून नो सरेंडर नावाच्या या गँगचे तीन सदस्य सिरीयात दाखल झाले असल्याचे वृत्त आहे. हे प्रशिक्षित सैनिक आहेत मात्र आता ते सेनेतून निवृत्त झाले आहेत. नो सरेंडर हा नेदरलंड मधील सर्वात मोठा बयकर क्लब आहे.

इसिसच्या मदतीसाठी विदेशी लढवय्ये मोठ्या प्रमाणात सिरीया आणि इराकमध्ये दाखल झाले असून त्यात अमेरिकन, ब्रिटीश, फ्रान्सच्या लोकांचा समावेश आहे. कुर्दिश सैन्याला मदत करण्यासाठी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन सिरीयातील इसिसच्या दहशतवादी तळांवर विमान हल्ले चढवित आहे. मात्र प्रत्यक्षात कुर्दिश लढवय्यांच्या मदतीसाठी लढणार्‍यांची संख्या अगदीच मामुली आहे. त्यामुळे बायकर गँगविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

या गँगचा प्रमुख ओट्टो याने त्यांचे तीन सदस्य सिरीयात लढण्यासाठी गेल्याचे मान्य केले आहे. नेदरलँड सरकारनेही या गँगला सिरीयात लढण्यासाठी हिरवा कंदिल दाखविला असल्याचे सांगितले जात आहे. सरकारी प्रवक्ते विमडी ब्रुईन म्हणाले की यापूर्वी परदेशात जाऊन शस्त्रदलात सामील होणे हा अपराध मानला जात होता मात्र आता हे निर्बंध काढून टाकले गेले आहेत. सिरीयात दाखल झालेले नो सरेंडर गँगचे सदस्य अॅमस्टरडॅम, रोटरडम आणि ब्रेडाचे रहिवासी असल्याचेही समजते.

Leave a Comment