मुथुरमण मंदिरातील अनोखा दसरा

kali
तमीळनाडूच्या कुलसेखरपट्टणम पासून २० किमी अंतरावरील तुतीकोरीन जिल्ह्यातील तिरूचेंदूर येथील मुथरम्मण मंदिरात अनोख्या पद्धतीने दसरा किंवा विजयादशमी साजरी केली जाते. आज पर्यंत ही प्रथा देशवासियांना फारशी परिचित नव्हती मात्र गेल्या कांही वर्षात हा अनोखा सण पाहण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. विजयादशमीच्या दिवशी येथे सुमारे १५ लाख भाविक येतात असेही सांगितले जाते. एरवी अगदी शांत असलेले हे छोटेसे गाव नवरात्र आणि दसरा उत्सवाच्या दहा दिवसांत गर्दीने गजबजून जाते.

या गावातील प्रथा अशी आहे की या दिवशी देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक आपल्या पसंतीप्रमाणे सोंग घेऊन येऊ शकतात. म्हणजे अगदी राजापासून भिकार्‍यापर्यंत आणि माकडापासून राक्षसापर्यंत अशा कुठल्याही वेशात भाविक येतात. देवीचे दर्शन घेतात आणि भिक्षा मागतात. भिक्षा मागण्याची प्रथा पडण्यामागे इगो किंवा आपल्या गर्वावर विजय मिळवून आपले पाय नेहमी जमिनीवरच राहू देणे हा उद्देश आहे. मग अगदी अब्जाधीश जरी असला तरीही तो या दिवशी आवर्जून भिक्षा मागतो.
dasara

येथील दुर्गा म्हणजे अम्मा देवी फार पॉवरफुल आहे असा भक्तांचा विश्वास आहे. तुमच्या सर्व इच्छा ती पूर्ण करतेच पण आजारांपासूनही मुक्ती देते. आंधळे. पांगळे, मतिमंद या देवळात येताच अम्माच्या दर्शनाने मनःशांती मिळवितात. आजकाल पर्यटन केंद्र म्हणूनही या गावाचा विकास केला जात आहे. इतिहासाचे गाढे संशोधक कोरकई सिवामणी सांगतात, कुलसेखर पंडियन या पंड्या वंशातील राजाने या गावाचा बंदर म्हणून विकास केला होता आणि येथून मोठा व्यापार केला जात होता. या राजाने येथे टांकसाळही सुरू केली होती परिणामी सोनार बहुसंख्येने येथील रहिवासी बनले होते.

मंदिरातील मूर्ती प्राचीन असली तरी १९०० शतकापासून येथे नवरात्र आणि दसरा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाऊ लागला असे पुरावे मिळतात. देवीची अनेक रूपे नऊ दिवसांत सादर केली जातात मात्र कालीमातेचे महत्त्व मोठे मानले जाते. तमीळनाडून गोलू बाहुल्या पुजल्या जातात त्यावरून देवीची विविध रूपे साकारली जातात.देवी कोणत्याही स्वरूपात दर्शन देऊ शकते म्हणून भाविक विविध प्रकारची सोंगे घेऊन दर्शनाला येतात. येथे या काळात विस्मरणात जाऊ पाहणार्‍या मथीलट्टम, ओलियाट्टम, करगट्टम हे नृत्यप्रकार आवर्जून सादर केले जातात तसेच नाटके, लोकसंगीत, पारंपारिक वाद्यवादन असेही कार्यक्रम होतात.

दसरा मिरवणूक काढली जाते व सायंकाळी किनार्‍यावर संहार कार्यक्रम केला जातो. भाविक त्या रात्री समुद्र किनार्‍यावरच झोपतात आणि सकाळी पुण्यस्नान करून आपल्या गावी परततात. किमान १०० वर्षे तरी ही परंपरा सुरू आहे.

Leave a Comment