दुर्गाष्टमी- महिषासूर वधाचा उत्सव

durga
देव आणि पृथ्वीवासियांना हैराण करून सोडलेल्या महिषासुर राक्षसाचा वध करण्यासाठी अवतार घेतलेल्या दुर्गेने त्याच्याशी सतत आठ दिवस युद्ध करून त्याला ठार केले तो दिवस दुर्गाष्टमी म्हणून साजरा करण्याची भारतात प्रथा आहे. या दिवशी दुर्गेबरोबरच तिच्या शस्त्रांचीही पूजा करण्याची पद्धत असन बंगाली लोकांमध्रे दुर्गापुजेचा सण हा प्रमुख सण म्हणून साजरा केला जातो. वीराष्मी असेही या दिवसाला संबोधले जाते आणि या दिवशी शस्त्र चालविणे, मार्शल आर्टचे खेळ मुद्दाम सादर केले जातात. कालिमाता या दिवशी दुर्गेच्या रूपात अवतरली असा भाविकांचा विश्वास आहे. या दिवशी चौसष्ठ योगिनी आणि दुर्गेची रूपे असलेल्या अष्ट नायिकांचीही पूजा केली जाते.

अष्टनायिका म्हणजे शक्तीचीच आठ रूपे मानल्या जातात. ब्राह्मणी, महेश्वरी, कामेश्वरी, वैष्णवी, वराही, नरसिंहिणी, इंद्राणी आणि चामुंडा ही ती अष्ट रूपे. भारतातील विविध धर्मांनुसार त्यांची पूजा केली जाते.बंगाल प्रमाणेच भारतात अनेक राज्यात दुर्गापूजेचा उत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक मंडपात दुर्गेची मूर्ती स्थापन करून तीन दिवस हा उत्सव साजरा होतो. यावेळी मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम आणि मेजवान्या दिल्या जातात.

बंगालमध्ये दुर्गापूजेसाठी मूर्ती बनविताना कांही नियम पाळले जातात. अक्षयतृतीयेलाच मूर्तीसाठी नदीकाठची पवित्र माती आणली जाते. गंगा नदीकाठची माती सर्वात पवित्र समजली जाते. त्यानंतर कोलकात्यातील वेश्या वस्तीतून त्यांच्या दारापुढची एक मूठ माती आणून ती नदीकाठच्या मातीत मिसळून मग दुर्गेची मूर्ती घडविली जाते. दुर्गेची मूर्ती दहा बाहू असलेली आणि सर्व बाहूत शस्त्रे धारण केलेली असते त्याचबरोबर तिची चार बाळे आणि दोन सहाय्यक देवतांच्या मूर्तीही केल्या जातात. केळीचे झाड केले जाते. महिषासूर दुर्गेच्या पायाखाली दाखविला जातो. देवीचे नेत्र रंगविताना चक्कू दान नावाने एक विधी असतो. त्यात रंगकाम करणारे देवीचे नेत्र पूजेच्या आधी १ दिवस रंगवितात व त्यादिवशी ते उपवास करतात.

संक्रातीप्रमाणेच दुर्गा कोणत्या वाहनावरून आली आणि कोणत्या वाहनावरून गेली यावरून कांही भाकिते वर्तविली जातात. उदाहरणार्थ दुर्गा बोटीत बसून आली तर निसर्गाची देणगी मिळणार म्हणजे पीक पाणी चांगले येणार असे सांगितले जाते. दुर्गाष्टमीची पूजा झाल्यानंतर दुर्गेचे पाण्यात विसर्जन केले जाते.

Leave a Comment