भारताचे हुकुमाचे तीन एक्के घडवतील २१ वे शतक- मोदी

modi
न्यूर्यार्क – भारतातील ६५ टक्क्यांपेक्षा अधिक संख्येने असलेली युवा लोकसंख्या, प्रचंड मोठी बाजारपेठ आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही हे भारताच्या हातातील तीन हुकुमाचे एकके आहेत. जगात आज कोणत्याच देशाकडे ही उपलब्धता नाही आणि त्यामुळेच या हुकुमाच्या एक्क्यांच्या जोरावरच २१ वे शतक हे भारताचे असेल असा विश्वास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक मेडिसन स्क्सेअर येथील भाषणात व्यक्त केला. इंडो अमेरिकन जनतेच्या मनाला स्पर्श करताना मोदींनी आपले मनोगत अतिशय नेटकेपणाने त्यांच्यासमोर मांडले आणि तेथे जमलेल्या तसेच जागा न मिळाल्याने बाहेर लावलेल्या स्क्रीनवर भाषण ऐकणार्‍या प्रचंड समुदायाची मने जिंकून घेतली.

भारतातील निवडणुकांपासून सुरवात करून ते म्हणाले की तुम्ही मतदान करू शकला नाहीत मात्र मला खात्री आहे की मतमोजणीच्या दिवशी तुमच्यापैकी प्रत्येकजण रात्रभर जागा राहिला असला पाहिजे. भारताची साप गारूड्यांचा देश अशी प्रतिमा जगाच्या डोळ्यासमोर होती मात्र आता आम्ही सापाशी खेळत नाही तर माऊसशी खेळतो. आमची युवा पिढी या माऊसला फिरवून जग फिरविते आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्यावर तुम्ही सर्वांनीच विश्वास टाकला आहे आणि मी शब्द देतो की तुमच्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ दिला जाणार नाहीच पण तुम्हाला मान खाली घालावी लागेल अशी एकही कृती आमचे सरकार करणार नाही.

आजपर्यंत भारतात विकासाची जबाबदारी सरकारनेच डोक्यावर घेतली होती असे सांगून ते म्हणाले की आम्ही विकासाची जबाबदारी आमच्या सव्वा कोटी जनतेबरोबर वाटून घेणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी म. गांधीनी जनआंदोलन उभारले व त्यामुळेच हा लढा यशस्वी होऊ शकला. त्याचप्रमाणे आम्ही देशाच्या विकासाचे जनआंदोलन उभारत आहोत.

आज सर्व जगात कामगारांची कमतरता आहे. भारताकडे इतके प्रचंड मनुष्यबळ आहे की सर्व जगाला कुशल कामगार आम्ही पुरवू शकतो. अमेरिकेत जगातील सर्व देशातील लोक येऊन राहिले आहेत मात्र जगात एकही देश असा नाही की जेथे भारतीय पोहोचलेला नाही. आमच्याकडेही उत्तम तंत्रज्ञान आहे आणि म्हणूनच आम्ही मंगळ मिशन यशस्वी करू शकलो असे सांगतानाच त्यांनी पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनसाठी कायम स्वरूपी व्हिसा देण्यात येईल अशी घोषणाही केली. निवडणुका जिंकणे म्हणजे केवळ सत्ता मिळविेणे नाही तर ती एक जबाबदारी आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment