‘मंगळयान’ मोहिम पूर्ण होण्यास उरले काहीच दिवस

isro
चेन्नई- भारताची महत्त्वाकांक्षी ‘मंगळयान’ मोहिम पूर्ण होण्यासाठी आता केवळ काहीच दिवस उरले असून भारतीय अंतराळ संशोधनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या ‘मंगळयानाने’ आज ३०० दिवसांचा प्रवास पूर्ण केला. हे यान मंगळावर जाण्यासाठी आता केवळ २३ दिवस उरले आहेत.

या यानाने आतापर्यंत ६२२ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास केला असून आता अंतिम टप्प्यातील १९९ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहिला आहे. या यानातील सर्व यंत्रणा सुरळीत असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) म्हटले आहे.

‘मंगळयाना’चे प्रक्षेपण ५ नोव्हेंबर २०१३ मध्ये आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून पीएसएलव्ही रॉकेटच्या सहाय्याने झाले होते. हे यान २४ सप्टेंबर रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.

या मंगळयानातील द्रवरूप इंजिन सुरू करण्याचा अत्यंत अवघड टप्पा आता येणार आहे. गेले १० महिने इंजिन सुप्तावस्थेत होते. मात्र, आता मंगळाच्या कक्षेत प्रवेश करताना ते सुरू करावे लागेल.भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात या मोहीमेमुळे नवीन संधी प्राप्त होणार आहेत.

Leave a Comment