शनीच्या बर्फाच्छादित चंद्रावर गरम पाण्याचे १0१ झरे !

saturn
वॉशिंग्टन – शनी ग्रहाचा बर्फाच्छादित चंद्र ‘एन्सॅलाडस’वर गरम पाण्याचे एक, दोन नव्हे, तर तब्बल १0१ झरे असल्याचे खगोल शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शनी आणि त्याच्या चंद्राचा अभ्यास करणार्‍या ‘कॅसिनी’ या अवकाश यानाने पाठविलेल्या माहितीचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा दावा केला असून यामुळे या ठिकाणी सजीव सृष्टी असण्याच्या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे.

‘नासा’ या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने पाठवलेले कॅसिनी यान गेल्या १0 वर्षांपासून शनी आणि त्याच्या चंद्राभोवती प्रदक्षिणा मारून त्यांचा अभ्यास करत आहे. ‘कॅसिनी’च्या शक्तिशाली कॅमेर्‍यांनी ‘एन्सॅलाडस’च्या दक्षिण धुव्रावर जमिनीतून पाण्याच्या वाफेची कारंजी उडत असल्याचे २00५ मध्येच टिपले होते. सुरुवातीला हे वितळलेल्या बर्फामुळे होत असल्याचे समजले जात होते; परंतु या चंद्राच्या भूपृष्ठाखाली पाण्याचे विशाल साठे असून त्यामधील पाणी हे या झर्‍याच्या माध्यमातून वर येत असल्याचे आता शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. वाघाचे पट्टे असलेल्या भागात हे गरम पाण्याचे १0१ झरे सापडले आहेत. ‘एन्सॅलाडस’च्या बर्फाच्छादित पृष्ठभागाखाली १0 किमी खोलीवर विशाल समुद्र असल्याचे ‘नासा’ने काही महिन्यांपूर्वी अधिकृतरीत्या घोषित केले होते. त्यामुळे भूपृष्ठाखालील समुद्र आणि गरम झर्‍यांच्या रूपाने वर येणारे पाणी या गोष्टींमुळे तेथे सजीव सृष्टी असण्याची शक्यता बळावली आहे. शनीला एकूण ६२ उपग्रह असून त्यापैकी ‘एन्सॅलाडस’ हा सहावा सर्वात मोठा चंद्र आहे.

Leave a Comment