लोकटक- जगातील एकमेव तरंगते सरोवर

manipur
मणिपूर राज्याला निसर्गाने मुक्त हस्ताने सौदर्याचे वरदान प्रदान केले आहे. जगातील सर्वात मोठे स्वच्छ पाण्याचे व तरंगते सरोवर लोकटक हे या राज्याच्या सौदर्याचा जणू मुकुटमणी म्हणता येईल. उत्तर पूर्व भारतातील या सरोवरात अनेक लहान मोठी बेटे तरंगताना दिसतात. या बेटांना फुमडी असे नांव आहे. या बेटांवर माती, विविध प्रकारची झाडे, सजीव आनंदाने नांदत आहेत. या फुमड्यांनी या सरोवरचा प्रचंड मोठा भाग व्यापला आहे. मणिपूरची राजधानी इंफाळ पासून ३९ किमी अंतरावर हे सरोवर आहे. फुमडीवरील टूरिस्ट रिसॉर्टमध्ये मुक्काम टाकून या सरोवराचा आनंद पर्यटक लुटू शकतात.

या सरोवराच्या दक्षिण पूर्व भागात ४० चौरस किलोमीटर परिसरात ही फुमडी बेटे पाहायला मिळतात. जगातील एकमेव लांब आणि मोठे तरंगते उद्यान याच ठिकाणी आहे. किबुल लामिआयो नॅशनल पार्क नावाच्या या पार्कमध्ये दुर्मिळ भुंकणारी हरणे आढळतात. त्यांना मणिपुरी भाषेत संगई असे म्हणले जाते. या सरोवराचे मणिपूरच्या आर्थिक विकासात मोठे योगदान दिले असून येथील सुमारे १ लाख नागरिक या सरोवरावरच उपजिविका करत आहेत. येथील पाण्यावर वीज निर्मिती केली जाते तसेच सिंचन आणि पिण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो.

मच्छीमारांसाठी हे सरोवर उपजिविकेचे महत्त्वाचे साधन असून या सरोवरात कृत्रिम फुमडी तयार करून त्यातही मासे वाढविले जातात. सरोवराची फुमडींवर २३३ जातींचे वृक्ष, पक्ष्यांच्या १०० हून अधिक प्रजाती तसेच प्राण्यांच्या ४२५ हून अधिक प्रजाती पाहायला मिळतात. सरोवराला भेट देण्यासाठी प्रथम इंफाळ येथे जावे लागते. हे शहर विमानसेवा आणि रस्तामार्गाशी चांगले जोडलेले आहे.

Leave a Comment