‘आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स’ सुपरस्टार पुण्याचा पुण्यकर उपाध्याय

गेले चार महिने अवघ्या महाराष्ट्राला नृत्याची झिंग देणा-या ‘आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स` या झी मराठीवरील भव्यदिव्य रिऍलिटी शोमध्ये पुण्याच्या पुण्यकर उपाध्यायने महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार हा किताब मिळवून या सिझनवर आपली दणदणीत मोहर उमटवली. तर अन्य चार तारे ठरले महाराश्ट्राचे डान्सिंग स्टार! ‘ग्रॅण्डमास्टर` उर्मिला मातोंडकरने डान्सिंग सुपरस्टारच्या डोक्यावर झी मराठीच्या वतीने मानाचा जरीपटका परिधान केला आणि त्यावर वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून रत्नजडित शिरपेचाने डान्सिंग सुपरस्टार अधिकच झळाळून गेला.

झी मराठीकडून विजेत्याला आणि त्याच्या कोरियोग्राफरला प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह बहाल करण्यात आले. तसेच केसरी ट्रव्हल्सकडून विजेत्याला थायलंड टूर आणि चार उपविजेत्यांना आणि त्यांच्या मास्टर्सना झी मराठीकडून प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा धनादेश आणि केसरीकडून सिमला कुलू मनाली पॅकेज टूर.

‘आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स`चा भव्य मंच उजळून निघाला महाराष्ट्राच्या या डान्सिंग स्टार्सच्या तळपत्या नृत्यांनी. अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारे स्वरुपचे शिलेदार प्रतीक आणि मृण्मयी, देवेंद्रचे दमदार सुमेध आणि पुण्यकर तर सोनियाची कलाकार पूजा एका अद्भुत वेडाने झपाटले होते. या पाचही जणांचा प्रत्येकाचा ध्यास एक…. त्यांची आस एक….’आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स“ च्या महामंचावर आपले नाव कोरण्याची!!! प्रत्येकाची धडपड लढण्याची…. प्रत्येकाची उर्मी जिंकण्याची! विजेतेपदावर आपले नाव कोरण्यासाठी पाचही जणांनी केले जीवाचे रान! यात पाचही ता-यांनी परस्परांना जोरदार ‘फाईट` दिली. मात्र सरतेशेवटी मास्टर स्वरुपचा शिलेदार मुंबईचा प्रतीक उतेकर आणि मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा पुण्यकर यांच्यात जबरदस्त चुरस रंगली आणि या नृत्याच्या महासंग्रामात बाजी मारली ती दमदार पुण्यकरने.

महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील सात हजार जिद्दी आणि जोषिल्या गुणवान नृत्यकलाकारांमधून केवळ अठरा डान्सिंग स्टार्सना ”आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स“ च्या मंचावर स्पर्धेत उतरण्याची संधी मिळाली होती. नवे तारे…..नवा जोष…..नवा उन्माद…. आणि नवी जिद्द घेऊन आलेल्या या मंचावरुन अठरा ता-यांची कसोटी पणाला लागली आणि मुंबईचा प्रतीक उतेकर आणि पुण्याचे सुमेध मुदगळकर, पूजा कदम, पुण्यकर उपाध्याय आणि मृण्मयी गोंधळेकर हे पुण्याचे चार तारे असे पाच कसोटीवीर महाअंतिम फेरीत स्थान मिळवू षकले. या पाचही जणांनी महाअंतिम फेरीत एकाहून एक सरस बहारदार आणि चित्तथरारक परफॉर्मन्सचे मनोरे रचत महाअंतिम फेरीवर अक्षरश: सोनेरी कळस चढवला. तर त्यांचे मास्टर्स स्वरुप मेदारा, देवेंद्र शेलार आणि सोनिया परचुरे यांची नृत्याची अजोड आणि बहारदार पेशकष देखिल रसिकांसाठी खास पर्वणी ठरली.

Leave a Comment