फॅशन मार्केटिंग

व्यवस्थापनाच्या आणि फॅशनच्या विश्‍वामध्ये निर्माण झालेल्या विशिष्ट परिस्थितीतून साकार झालेला एक नवा अभ्यासक्रम म्हणजे फॅशन मार्केटिंग मॅनेजमेंट. ज्यांच्याकडे उत्तम संभाषण कौशल्य असेल, मार्केटिंगची हातोटी हस्तगत झालेली असेल त्यांना या क्षेत्रात चांगली संधी उपलब्ध आहे. फॅशनच्या विश्‍वात डिझायनिंग हा बेसिक कौशल्याचा भाग आहे. त्यानंतर डिझाईन केलेले कपडे शिवणे, त्यावरची नक्षी, एम्ब्रॉयडरी आदी प्रकार करून तो कपडा सजवण्याचे कौशल्य आवश्यक आहे. परंतु हे सगळे केल्यानंतर या उद्योगाची आर्थिक नियोजनाची बाजू अधिक महत्वाची आहेच. पण फॅशनच्या कपड्यांचे मार्केटिंग करणे हा सर्वाधिक अवघड, गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक भाग आहे. हे आव्हान विचारात घेता या क्षेत्राकडे वळणारे लोक फार कमी आहेत आणि एका बाजूला फॅशनचे विश्‍व प्रचंड गतीने विकसित होत असतानाच मार्केटिंगचे आव्हान स्वीकारणार्‍या लोकांची कमतरता भासत आहे. त्यातून हा अभ्यासक्रम विकसित झालेला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी फॅशन इंडस्ट्रीचे मार्केटिंग करण्याचे काम तर करू शकतातच, परंतु स्वत:चे फॅशनेबल कपड्यांचे रिटेल दुकान सुद्धा टाकू शकतात.

सध्या तयार कपड्यांचे एक्स्ल्यूजीव्ह रिटेल स्टोअर्स मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत किंवा मोठ्या मॉलमध्ये अशा स्टोअर्सना जागा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा मॉलमध्ये फॅशन मार्केटिंग करणारा विद्यार्थी स्वत:चा एक विभाग उघडू शकतो. हे काम करताना मार्केटिंगच्या क्षेत्रात नेमके काय चाललेले आहे याचे ट्रॅकिंग करण्याचे म्हणजेच मागणीचा अंदाज घेण्याचे कौशल्य त्याच्याकडे असावे लागते. फॅशन डिझायनिंगचा वापर करून असे कपडे तयार करणार्‍या कारखान्यांमध्ये हे विद्यार्थी हे कपडे विकण्याचे काम करू शकतात. त्यांना विविध प्रकारच्या दुकानदारांशी आणि व्यापार्‍यांशी संपर्क साधावा लागतो. परंतु ज्या विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम करून स्वत:चा व्यवसाय करायचा असेल त्याला अशा व्यापार्‍यांचा शोध घ्यावा लागतो आणि असा शोध घेतल्यानंतर लेटेस्ट फॅशनचे तयार कपडे बनवणारे कारखानदार कोणते, त्यापैकी कोणाकडून स्वस्तात आणि भरपूर उधारीने माल मिळू शकेल याचाही अंदाज घ्यावा लागतो. अशा रितीने उत्पादक आणि विक्री करणारा व्यापारी अशा दोन्ही अंगांनी या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी कार्यरत रहात असतो. या विशिष्ट कौशल्याचे अभ्यासक्रम अनेक खाजगी संस्थांनी सुरू केलेले आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांमध्ये ते उपलब्ध आहेत. त्यांचा शोध घेतला पाहिजे. कारण अजून तरी मान्यताप्राप्त विद्यापीठांनी असे अभ्यासक्रम सुरू केलेले नाही. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये म्हणजे आय.टी.आय. मध्ये फॅशन डिझायनिंगचे अभ्यासक्रम आहेत. ते पूर्ण करणार्‍यांना मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम करता येऊ शकतील. इच्छुकांनी [email protected] या पत्त्यावर संपर्क साधावा.

Leave a Comment